

Evolution of the Indian Textile Industry
esakal
प्राची गावस्कर
आधुनिक काळातील वस्त्रोद्योग देशातील अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिका बजावत आहे. पारंपरिक वस्त्रशैली आणि आधुनिक तंत्रज्ञान, कापूस उत्पादनाला प्रोत्साहन, कारागिरांना साह्यकारी योजना यांमुळे हा उद्योग वेगवान प्रगती करून आपले आर्थिक ताणेबाणे अधिक जरतारी करेल, यात शंका नाही.
कॉलेजात असताना एकदा ‘साडी डे’साठी मी आईची कॉटनची एक सुंदर साडी नेसण्याचा हट्ट करत होते. मात्र, आईने अजिबात मला ती साडी दिली नाही. तिचे म्हणणे होते, की ती अस्सल सुती साडी आहे आणि अतिशय महाग आहे. ती साडी काही सिल्कसारखी चमकदार नव्हती; पण तिचा रंग, स्पर्श, पोत अतिशय सुंदर होता. अंगावर ती साडी अतिशय उत्तमपणे बसायची. सगळे म्हणायचे, ‘वा! किती छान साडी आहे’! त्या साडीमुळे कॉटन अर्थात सुती साड्यांचे आणि कपड्यांचे प्रेम माझ्या मनात कायमचे रुजले. कामानिमित्त, पर्यटनासाठी देशातील विविध ठिकाणांना भेटी देताना तिथल्या पारंपरिक हातमागावरील सुती, रेशमी साड्या आणि कपडे आणण्याची आवड जोपासली गेली. त्यामुळे देशातील समृद्ध वस्त्रकलेबद्दल, आजही ही पारंपरिक कला जोपासणाऱ्या विणकरांबद्दल उत्सुकता वाढत गेली. हातमागाकडून यंत्रमागाकडे झालेले संक्रमण, सुती धाग्यांकडून पॉलिएस्टर आणि अन्य कृत्रिम धाग्यांमुळे वाढलेला कापडउद्योग आणि त्याचे आर्थिक ताणेबाणे मला खुणावू लागले. आज आधुनिक काळातही या उद्योगानेही कात टाकली असून, त्याच्या आर्थिक तानाबाण्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही नवी झळाळी दिली आहे, याची जाणीव झाली.