डॉ. नंदिनी लोंढे
वैद्यकीय पर्यटनातून जगाच्या नकाशावर दिमाखात झळकण्याची क्षमता आपल्याकडे नक्कीच आहे... आता त्या क्षमतेचा फायदा करून घेण्याची वेळ आली आहे... वैद्यकीय पर्यटनासारखे अनोखे क्षेत्र आपल्याला खुणावत आहे...
भल्या पहाटे फोनची कर्कश्श रिंग वाजली. सुलभानं घड्याळावर नजर टाकली... अशा अवेळी म्हणजे अमेरिकेतून तर नाही हा फोन..? अमेरिकेला मोठ्या दिरांकडे राहत असलेल्या सासूबाई गेल्या आठ-दहा दिवसांपासून गुडघ्याच्या दुखण्यानं अतिशय त्रस्त होत्या. चालता येत नाही आणि वेदना थांबत नाहीत अशी परिस्थिती होती. त्यात पुन्हा तपासणीसाठी तिकडच्या डॉक्टरांची वेळ घेणं म्हणजे फारच जिकिरीचं काम... कशीबशी भेट ठरली.
तपासणीही झाली. पण ती तपासणी करेपर्यंत वेळ गेलाच. काहीतरी निष्कर्षापर्यंत पोहोचलोय असं वाटेपर्यंत सांधे प्रत्यारोपण करण्यासाठी आणखी तीन महिन्यांनी नंबर लागेल असं सांगण्यात आलं..! झालं..!! सासूबाईंनी चांगलीच हाय खाल्ली!
आता तीन महिने हा आजार कसा सोसायचा असा प्रश्न साऱ्या घरादाराला पडला. रोज असा अवेळी फोन वाजला की सुलभाच्याच काळजाचा ठोका चुकायचा... कसं सहन करत असतील या वयात!?