Indus Valley Maritime Trade
esakal
डॉ. श्रीकांत कार्लेकर
बाहेरील जगाशी व्यापार करण्यासाठी वापरली जाणारी जहाजे भरतीच्यावेळी गोदीत येत किंवा जात असत. ओहोटीच्यावेळी जहाजे माल उतरवण्यासाठी किंवा चढवण्यासाठी गोदीतच थांबत असत. गोदीतून लहान शिडाच्या बोटी उत्तरेकडील विविध वस्त्यांमध्ये माल वाहून नेत असत आणि तेथून दूरच्या किनाऱ्यांकडे जाणाऱ्या जहाजांवर चढवण्यासाठी माल आणत असत.
सिंधू संस्कृती सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या काठावर भरभराटीस आली. मेसोपोटेमिया आणि इजिप्तच्या संस्कृतींप्रमाणेच ही संस्कृतीदेखील सिंधू नदीच्या दोन्ही काठांवरील पूरमैदानी शेतीवर आधारित होती. या ठिकाणावरून होणारा व्यापार पर्शियन आखातामार्गे समुद्राद्वारे होत असे. पण असे असेल तर सिंधू संस्कृतीच्या भरभराटीसाठी आवश्यक असलेले बंदर नेमके कोठे होते असा प्रश्न पडतो. सध्याच्या सिंधू त्रिभुज प्रदेशात कोणत्याही बंदराचा पुरावा आढळत नाही. खरेतर, कमी खोली, नागमोडी प्रवाह, सरकणारे वाळूचे ढिगारे आणि वारंवार येणारे पूर यांमुळे हा त्रिभुज प्रदेश बंदरासाठी कधीच फारसा योग्य नव्हता.