

Insurance vs Investment
esakal
डॉ. अमेय खरे
विमा हे परतावा देणारं साधन नाही, ते जोखीम कमी करणारं साधन आहे. विम्याला गुंतवणुकीच्या इतर पर्यायांच्या तराजूत तोलणं चुकीचं ठरतं. संरक्षण आणि वाढ या दोन्ही गरजा वेगळ्या साधनांनी, पण एकत्रित नियोजनानं साधल्या जातात. विमा आणि गुंतवणूक या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेतच, पण त्या एकमेकांत मिसळल्या की दोन्हींचा खरा फायदा कमी होतो.
सुहासनं दहा वर्षांपूर्वी एक विमा पॉलिसी घेतली होती. दरवर्षी हप्ता भरला. गेल्या महिन्यात पॉलिसी संपली आणि त्याला एक रक्कम परत मिळाली. सुहास खूश झाला, पैसे वाढून परत आले. पण एका मित्रानं विचारलं, या दहा वर्षांत जर तू तेच पैसे म्युच्युअल फंडात गुंतवले असतेस, तर किती परतावा मिळाला असता? सुहासकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. हाच प्रश्न अनेकांच्या विमा निर्णयांमागे लपलेला असतो.
मागच्या लेखात (पगार वाढतोय, बचत वाढत नाही?, ता. ११ जुलै) आपण लाइफस्टाइल इन्फ्लेशनबद्दल बोललो. उत्पन्न वाढल्यावर खर्च कसा वाढत जातो हे पाहिलं. आजच्या लेखात आपण एका वेगळ्या, पण तितक्याच महत्त्वाच्या विषयाकडे वळणार आहोत, तो म्हणजे विमा. विमा हा खर्च आहे की गुंतवणूक, हा प्रश्न अनेक कुटुंबांच्या आर्थिक नियोजनात गोंधळ निर्माण करत असतो. आजच्या लेखात आपण हा गोंधळ सोप्या भाषेत दूर करण्याचा प्रयत्न करू या.