

ITEP Course Benefits
esakal
डॉ. वंदना कमल रामराव केंजळे
इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्रॅम या अभ्यासक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत आवश्यक बदल केले, तर आयटीईपी अभ्यासक्रमातून शिकलेला विद्यार्थी एक शिक्षक म्हणून शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक क्रांती घडवू शकतो. या अभ्यासक्रमामुळे एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार सक्षम, नैतिक आणि नवोन्मेषी शिक्षक घडू शकतात.
इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्रॅम (आयटीईपी) म्हणजे एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम. हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने आणि नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन (एनसीटीई) यांनी सुरू केलेला शिक्षक प्रशिक्षणाचा नवीन अभ्यासक्रम असून तो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०अंतर्गत (एनईपी) विकसित करण्यात आला आहे. पूर्वी शिक्षक होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम बी.ए., बी.एस्सी. किंवा बी.कॉम. यातील एखादी पदवी पूर्ण करावी लागायची आणि त्यानंतर बी.एड. करावे लागायचे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारणपणे पाच वर्षे लागत होती. परंतु आयटीईपीमध्ये पदवी आणि बी.एड. हे दोन्ही अभ्यासक्रम एकत्र करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी बारावीनंतर थेट चार वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम करून शिक्षक होऊ शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला गणिताचा शिक्षक व्हायचे असल्यास जुन्या पद्धतीनुसार त्याला/तिला प्रथम तीन वर्षांचा बी.एस्सी. अभ्यासक्रम आणि नंतर दोन वर्षांचा बी.एड. अभ्यासक्रम करावा लागायचा, म्हणजे एकूण पाच वर्षे लागायची. परंतु आयटीईपीनुसार तोच विद्यार्थी बारावीनंतर थेट चार वर्षांचा बी.एस्सी.-बी.एड. किंवा बी.ए.-बी.एड. कोर्स करू शकतो. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ तर वाचतोच, तसेच सुरुवातीपासूनच त्यांना शिक्षक होण्यासाठी प्रशिक्षण मिळते.