Premium|Ethiopia Assignment : आफ्रिकेतील इथिओपिया : मानवतावादी कायद्याच्या कामासोबत निसर्गाचा अनोखा अनुभव

Ethiopia and International Humanitarian Law : आंतरराष्ट्रीय रेडक्रॉससाठी कायदा सल्लागार म्हणून इथिओपियात झालेली बदली, आफ्रिकेतील युद्धग्रस्त भागांमध्ये मानवतावादी कायद्याचा प्रसार आणि तेथील निसर्ग, संस्कृती व लोकजीवनाचा अनुभव
Ethiopia and International Humanitarian Law

Ethiopia and International Humanitarian Law

esakal

Updated on: 

वोंडीला मी नेहमी सोबत घ्यायचो. तो प्रवासात असला, की गप्पांमध्ये आमचा वेळ छान जायचा. पण यावेळेला वोंडीनं केलेला खुलासा ऐकून बसलेल्या धक्क्यातून सावरायला दहा किलोमीटर अंतर जाऊ द्यावं लागलं. गाडी एका खड्ड्यातून गेल्यामुळे बसलेल्या धक्क्यानं मी पहिल्या धक्क्यातून भानावर आलो. थोड्या वेळानं कमालनं गाडी थांबवली. एका मोठ्या झुडपाच्या आडोशाला आम्ही कपडे बदलले आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. वोंडीला त्या आदिवासी मुलाची भाषा अवगत नसती, तर कोणता प्रसंग ओढवला असता!

जवळपास वीस वर्षं आंतरराष्ट्रीय कायद्याचं अध्यापन केल्यानंतर १९९८मध्ये मी जिनिव्हा, स्वित्झर्लंड इथं मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय रेडक्रॉससाठी विभागीय कायदा सल्लागार म्हणून काम करू लागलो. आमच्या संस्थेचं मुख्य काम युद्धग्रस्तांना मानवतावादी दृष्टिकोनातून मदत करणं. त्याबाबतच्या आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांचा प्रसार करणं आणि अंमलबजावणीस चालना देण्याचं काम माझ्याकडे होतं. सुरुवातीला सहा वर्षं नवी दिल्ली इथं राहून दक्षिण आशिया विभागासाठी काम केल्यानंतर २००४मध्ये दक्षिण-पूर्व आणि पूर्व आशिया विभागासाठी माझी मलेशियाला बदली झाली. तिथे पाच वर्षं काम केल्यानंतर जिनिव्हातल्या मुख्यालयात काम करावं, असं आमच्या मानवी साधनसंपत्ती विभागानं मला सूचित केलं. पण मी त्यांना कळवलं, की माझी बदली आपल्या आफ्रिकेतील एखाद्या ऑफिसमध्ये केलीत, तर मला जास्त आनंद होईल. त्याला काही कारणं होती. पहिलं असं, की १९८१पासून माझा युरोप, उत्तर व दक्षिण अमेरिका, संपूर्ण आशिया, प्रशांत, मध्यपूर्व अशा भागांमध्ये खूप प्रवास झाला होता आणि काही ठिकाणी दीर्घकाळ वास्तव्यही झालेलं होतं, पण आफ्रिकेला मात्र मी कधी गेलो नव्हतो. ज्या आफ्रिकी देशांनी युद्धांना आणि हिंसाचाराला कित्येक दशकं तोंड दिलं, तिथं आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याच्या प्रसाराची खूप गरज होती. शिवाय मला निसर्गाची आवड असल्यानं तेथील वन्यजीवन पाहण्याचीही तीव्र इच्छा होतीच.

मुख्यालयानं माझी विनंती मान्य केली आणि २००९मध्ये तीन वर्षांसाठी माझी बदली इथिओपियाला कायदा सल्लागार आणि जनसंपर्क अधिकारी या पदावर केली. इथिओपियाबद्दल आपल्याकडे खूप गैरसमज आहेत. त्यासारखा निसर्गसुंदर व थंड हवेचा देश साऱ्या आफ्रिकेत पाहायला मिळणार नाही. तिथले लोक काहीसे उजळ, नाकेले नि देखणे. ते सर्वसाधारण आफ्रिकी लोकांसारखे दिसत नाहीत. त्यांचा ‘हाबेशा’ हा वंशदेखील इतर आफ्रिकींपेक्षा वेगळा आहे. तिथली जवळजवळ साठ टक्के जनता सनातनी ख्रिस्ती, तर चाळीस टक्के जनता मुस्लिम होती. एकेकाळी जीवघेण्या दुष्काळाला तोंड दिलेल्या इथिओपियात आज सुबत्ता आहे. देश उद्योगात आणि कृषी क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करत आहे.

Loading content, please wait...