डॉ. हंसाजी योगेंद्र
‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ ही आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ची संकल्पना मानव आणि पृथ्वीच्या आरोग्याचा परस्परसंबंध दर्शवते. योग हा शारीरिक, मानसिक आणि पर्यावरणीय संतुलनाचा शाश्वत मार्ग आहे. आसने, प्राणायाम, ध्यान आणि सात्त्विक जीवनशैलीद्वारे योग व्यक्तिगत आणि वैश्विक कल्याण साधतो. अहिंसा, संतोष आणि सजगता यातून निसर्गाशी सुसंवाद साधता येतो.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रसन्न आणि मंगलमय प्रातःकालात जगभरातील असंख्य साधक योगाचरणासाठी आसन मांडतील. यंदाच्या योग दिनाची संकल्पना ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित नाही, तर मानवजातीच्या आणि पृथ्वीच्या सुदृढ आरोग्यामधील परस्परसंबंधांची ठळक आठवण करून देणारा स्पष्ट संदेश आहे. आपले प्राचीन ज्ञान आधुनिक काळातील ज्वलंत समस्यांवर मार्गदर्शक म्हणून उपयुक्त ठरत असल्याचे मी असंख्य वेळा अनुभवले आहे.