सम्राट कदम
आपल्या दिवसाची सुरुवात होते ती दुधाच्या पिशवीनं, दिवस मावळतो तो कुरकुरीत चिवड्याच्या प्लॅस्टिक पिशवीनं. हीच आपली दिनचर्या. पण या सहज वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तू नंतर जातात कुठे? याचा विचार आपण क्वचितच करतो. खरंच प्लॅस्टिकचा पुनर्वापर होऊ शकतो का, की ही केवळ एक फसवी कल्पना आहे? तथ्यांमधून, प्रयोगांमधून आणि भूतकाळातील अनुभवांतून या प्रश्नांचा घेतलेला वेध...
आजच्या घडीला भारतात दररोज सुमारे २६ हजार टन प्लॅस्टिक कचरा तयार होतो. वर्षभरात हा कचरा पोहोचतो तब्बल ९५ लाख टनांवर! हे फक्त आपलं चित्र. जगभरातील मानवजात वर्षाला सुमारे ४० कोटी टन प्लॅस्टिकचा कचरा निर्माण करते. आकड्यांमध्ये किंचित वर-खाली फरक असला, तरी हा उकिरडा इतका मोठा आहे, की भविष्यातील सजीवसृष्टीचं अस्तित्वच धोक्यात येईल, याबद्दल मनात कोणतीच शंका राहत नाही. म्हणजे आपल्या हातातून बाहेर गेलेली एक साधी प्लॅस्टिकची पिशवी, बाटली किंवा झाकण वर्षानुवर्षे मातीत राहणार आणि निसर्गाच्या श्वासात अडथळा निर्माण करणार. खरंच प्लॅस्टिकचा पुनर्वापर शक्य आहे का, की हा कधीही न कुजणारा, न विघटणारा ‘चिरंजीव शाप’ सृष्टीवर कोरला गेला आहे, अशी शंका प्रकर्षानं निर्माण होऊ लागली आहे.