डॉ. अनिल लचके
भावीकाळामध्ये आंतरग्रहीय मोहिमांसाठी डॉकिंगचे प्रयोग अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. चांद्रयान-४ किंवा त्यानंतरच्या मोहिमांमध्ये चंद्रावरची माती आणि दगड पृथ्वीवर आणून त्याचे रासायनिक आणि भौतिक परीक्षण करता येईल. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या धर्तीवर भारतीय अवकाश स्थानक स्थापन करण्याची भारताची इच्छा आहे. हे सर्व काही साध्य करण्याच्या दृष्टीने टार्गेट आणि चेसर उपग्रहांचे यशस्वी झालेले मीलन इस्रोच्या तंत्रज्ञांना मोठी उमेद देणारे आहे.
तीन आठवड्यांपूर्वी, १६ जानेवारीला पहाटेच्या सुमारास इस्रोने स्पेडेक्स मिशन यशस्वी करून अंतराळ तंत्रज्ञानातील एक मोठे पाऊल टाकले. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन -इस्रो म्हणजे भारतीय अवकाश संशोधन संस्था. त्यांनी यशस्वी केलेल्या डॉकिंग प्रयोगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्पेडेक्स म्हणजे स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंटचे संक्षिप्त रूप. दोन उपग्रह किंवा दोन अंतराळयाने अंतराळातच एकमेकांना अलगद येऊन मिळतात, जोडली जातात त्याला डॉकिंग म्हणतात. नियोजित कार्य पार पाडल्यानंतर ही संलग्न झालेली अंतराळयाने विलग होतात, याला अनडॉकिंग म्हणतात.