

Italian Culture and Fashion
esakal
अदिती मराठे
इटालियन लोक मुळातच फार गोड; ते खूप बोलतात आणि खूप चालतात. फॅशन सेन्ससाठी तर ते जगप्रसिद्ध आहेतच. पूर्वी राशिचक्र कार्यक्रमात ऐकलेला एक विनोद आठवतो - ‘वृषभ राशीच्या बायका दूध आणायला निघाल्या तरी लग्नाला निघाल्यासारख्या वाटतात.’ या न्यायानं बहुतांश इटालियन्स वृषभ राशीचे वाटतील! सतत प्रेझेंटबल राहणं त्यांच्या संस्कृतीचा भाग झाला आहे.
प्रवासाचं बाळकडू खरंतर आई-बाबांकडून मिळालं. मला नीटसं आठवतही नसलेल्या वयात केलेले कन्याकुमारी, केदारनाथ, गोवा असे सगळ्या दिशांकडचे प्रवास आता फोटोंमधून डोकावतात. लहानपणीच्या कित्येक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या माझ्या आठवणी प्रवासांच्याच आहेत.
दरवर्षी शाळा-क्लासेसवर होणारा खर्च, घरखर्च, पाहुणे-सणवार-आजारपणं हे सगळं निभावून प्रवासासाठी वेगळं बजेट कटाक्षानं राखून ठेवताना आई-बाबांना मी कायम पाहिलंय. इंटरनेट नसलेल्या काळातही चोख प्लॅनिंग, निगुतीनं केलेली तयारी, कडक इस्त्री केलेले कपडे नियोजनपूर्वक बॅगेत भरणं, सामानाची चेकलिस्ट तयार करणं अशा एक ना अनेक कामांत ट्रिपच्या आधीचे दिवस उडून जायचे.