

Adult Diaper Disposal Japan
esakal
अरविंद रेणापूरकर
वाढते आयुर्मान, बदलती जीवनशैली आणि पुरुषांमध्येही विविध वैद्यकीय कारणांमुळे वापरले जाणारे अडल्ट डायपर्स, मूत्रनियंत्रण पॅड्स किंवा इतर स्वच्छता साहित्याची गरज लक्षात घेऊन जपानने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रेल्वे स्थानके, रुग्णालये, सरकारी कार्यालये, शॉपिंग मॉल्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणांवरील पुरुषांच्या स्वच्छतागृहांत सॅनिटरी बिनची सुविधा देत जपानने स्वच्छतेसोबतच समावेशकता, मानवी सन्मान आणि बदलत्या सामाजिक वास्तवाला प्राधान्य दिल्याचा नवा आदर्श जगासमोर ठेवला आहे.
ज पान हा जगातील सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. सुमारे ३.६२ कोटी नागरिक ६५ वर्षांवरील असून, ते देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास २९ टक्के आहेत. म्हणजेच प्रत्येक दहा जपानी नागरिकांंपैकी जवळपास तीनजण ज्येष्ठ आहेत. कमी जन्मदर आणि दीर्घ आयुर्मानामुळे ही संख्या सातत्याने वाढत आहे. वय वाढल्यानंतर अनेक पुरुषांना मूत्र असंयम (Urinary Incontinence), प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, प्रोस्टेट कर्करोगावरील उपचारांचे दुष्परिणाम किंवा इतर मूत्रविकार यांमुळे मूत्रशोषक पॅड्स किंवा प्रौढांसाठीची डायपर्स वापरावी लागतात. मात्र, पुरुषांच्या स्वच्छतागृहांत अशा वापरलेल्या साहित्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र कचरापेटी उपलब्ध नसल्याने अनेकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन जपानमधील अनेक स्थानिक प्रशासने, रुग्णालये आणि खासगी कंपन्यांनी २०२२पासून पुरुषांच्या स्वच्छतागृहांत सॅनिटरी बिन बसविण्याची मोहीम सुरू केली गेली. सुरुवातीला काही नगरपालिकांपुरती मर्यादित असलेली ही सुविधा आता देशभरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी पोहोचली आहे.