प्रशांत दळवी
दळवींची प्रतिभा माझ्या नाटकाचा कुठेतरी आरंभबिंदू ठरली. आमचं नातं एका सर्जनशिलतेच्या धाग्यानंही नकळत जोडलं गेलं. त्याबद्दल या जन्मशताब्दीच्या निमित्तानं अपार कृतज्ञता. नामसाधर्म्यामुळे कुणीही आता विचारलं की ‘जयवंत दळवी तुमचे कोण?’ तर मी ‘नाट्यपूर्वज’ असं हक्कानं म्हणायला आता मोकळा...
‘जयवंत दळवींचे तुम्ही कोण?’ हा प्रश्न मला सुरुवातीच्या काळात अनेकदा विचारला जायचा. ‘कुणी नाही’, असं मी सहज सांगून जायचो. पण मी त्यांचा ‘खरंच कुणीच कसा नाही?’ असा प्रश्न मनात येऊन जायचा. मग मी त्यांच्याशी असलेल्या माझ्या नात्याचा कळत-नकळत शोध घेऊ लागलो. मी मुंबईत आल्यानंतरही तशी जयवंत दळवींशी कधी गाठभेट झाल्याचं स्मरत नाही.