गिरीश दळवी
बाबांची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची तत्त्वं. ती त्यांनी अगदी काटेकोरपणे अमलात आणली. आम्हालाही शिकवली. त्यांच्या नाटकांना आम्हीही तिकिटं काढूनच जायचो. त्यांनी नाटक निर्मात्यांना सांगूनच ठेवलं होतं, की आमच्यापैकी कोणीही आलं तरी तिकिटाचे पैसे घ्यायचे. आणि जर आम्ही दिले नाहीत तर माझ्या रॉयल्टीमधून कापून घ्या.
ते युसिसमध्ये असताना त्यांची खूप फिरती असायची. विमान प्रवासाची मुभा असूनही ते बहुतेक वेळा ट्रेननं प्रवास करायचे. मुख्य हेतू असायचा गर्दीतल्या लोकांचं निरीक्षण करता यावं. तसंच आरवली-गोव्याला जाताना ते बसनेच जायचे. त्यांना लोकांच्या स्वभाव विशेषाबद्दल फार आकर्षण होतं. ते त्यांच्या कथा-कादंबऱ्या-नाटकांत दिसलंही.
सामान्य लोकांत लेखकाबद्दल खूपच कुतूहल असतं. विशेषतः त्याच्या घराबद्दल... त्याच्या एकूण खासगी आयुष्याबद्दल. लेखकाचं घर कसं असतं... घरातलं वातावरण कसं असतं... लेखकाचे घरातल्या इतर व्यक्तींशी संबंध कसे असतात... त्याचं घरात वावरणं कसं असतं... मुख्य म्हणजे त्याच्या प्रसिद्धी वलयाचा ह्या सगळ्यावर किती परिणाम होत असतो... वगैरे.
मला समजायला लागलं तेव्हापासून आठवतंय, आम्ही दादरमध्ये शिवाजी पार्कजवळ मलिक बिल्डिंगमध्ये राहत होतो. ते आमचं पहिलं घर. ‘आमच्या’ त्या घराचं ‘लेखकाच्या’ घरात सर्वप्रथम रूपांतर झालं ते १९६२मध्ये, जेव्हा बाबांना चक्र कादंबरीसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला.
त्याआधी मॅजेस्टिक प्रकाशनाने घोषित केलेल्या कादंबरीलेखन स्पर्धेत ह्याच कादंबरीला प्रथम पुरस्कार मिळाला होता आणि तेव्हापासूनच बाबांचे मॅजेस्टिक आणि केशवराव कोठावळे ह्यांच्याशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले, ते अखेरपर्यंत.