

Cloth Doll Craft
esakal
वर्षा गजेंद्रगडकर
बाहुल्या तयार करण्याची प्रक्रिया पर्यावरणपूरक आहे. निसर्गातली कुठलीही वस्तू कचरा नसते; तिच्यापासून अतिशय सुंदर, कलापूर्ण आणि अभिनव निर्मिती होऊ शकते, हे झाबुआ बाहुल्या तयार करणाऱ्या कलाकारांनी सिद्ध केलं आहे. मुख्यतः वापरून जुन्या झालेल्या कपड्यांपासून या बाहुल्या केल्या जातात.
बाहुली हा मानवी आयुष्याचा कायमच एक अतूट भाग राहिला आहे. बाहुली म्हणजे बालपणाचं, विशेषतः मुलींच्या बालपणाचं प्रतीक आहे. ती बालपणातली जवळची मैत्रीणच आहे. जगातलं कुठलंही ठिकाण असो, लहान वयात बाहुलीशी जुळणारं नातं माणसाची भावनिक जडणघडण करत आलं आहे. सुमारे पाच हजार वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या भारतात तर देशाच्या सांस्कृतिक राजदूत म्हणून बघता येतील, इतक्या बाहुल्या प्राचीन आहेत. बाहुल्यांविषयीचं प्रेम भारतीय माणसांच्या रक्तातच रुजलं आहे. माती, धातू, कापड, लाकूड आणि आधुनिक काळात प्लॅस्टिकपासूनही बाहुल्या तयार केल्या जाताहेत. अशा हातांनी केलेल्या कापडी बाहुल्यांनीच मध्य प्रदेशातल्या एका छोट्या आदिवासी प्रदेशाला ओळख मिळवून दिली आहे. बाहुल्या तयार करण्याची ही हस्तकला मध्य प्रदेशातल्या झाबुआ जिल्ह्यातली अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि देशातल्या सर्वात जुन्या हस्तकलांपैकी एक आहे.
मानवी संस्कृतीच्या वाटचालीत वस्त्राचा इतिहास जेवढा जुना आहे, तेवढाच बहुधा कापडी बाहुल्यांचाही आहे. प्राचीन इजिप्तमध्ये कापडी बाहुल्या केल्या जात होत्या, असं एका उत्खननातून स्पष्ट झालं आहे. वस्त्रं शिवून झाल्यावर उरलेलं कापड किंवा चिंध्या सहज उपलब्ध होत असल्यामुळे कापडी बाहुल्यांचं अस्तित्व प्राचीन असणार आणि ते काळाच्या ओघात टिकूनही राहिलं असणार, हे उघड आहे. धातू किंवा लाकडाच्या तुलनेत कापडावर काम करणं सोपं असतं आणि बाहुल्या तयार करण्याकरता लागणारी साधनं मिळवणंही फार अवघड नाही. शिवाय, धातू किंवा लाकडी बाहुल्यांपेक्षा कापडी बाहुल्यांचा मऊ स्पर्श मुलांसाठी सोयीचा आणि आनंददायीही असतो. त्यामुळे जगभरात अनेक ठिकाणी कापडी बाहुल्या लोकप्रिय झाल्या आहेत.