

Career Planning for Youth
esakal
डॉ. अरविंद शाळिग्राम
आपल्या व्यवसायाचे स्वरूप जसे असेल त्या प्रमाणात आणि त्या वेगाने आपली प्रगती होईल, हे सूत्र ध्यानात ठेवले, म्हणजे व्यवसायाची सुरुवात करताना ठरावीक कालावधीपुरती व्यावसायिक उद्दिष्टे ठरवता येतात. नंतर हळूहळू मोठी झेप घेता येते. त्यानुसार स्ट्रॅटेजी आखता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक तरुण व्यावसायिकाने अंगी लवचिकपणा बाळगावा आणि ठामपणे मार्गक्रमण करावे.
या पृथ्वीतलावरच्या जवळपास प्रत्येकाला तारुण्यात प्रवेश करताना एक महत्त्वाचा प्रश्न पडतो - माझ्या करिअरचे काय? जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी, माझे छंद पुरवण्यासाठी, मनोरंजनासाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी आवश्यक संसाधनांच्या निर्मितीसाठी लागणारी संपत्ती मी कशी मिळवू? किती संपत्ती पुरेशी ठरेल? असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडतात. साधारण तारुण्य हा कोणत्याही व्यक्तीसाठी कर्तृत्वाला सुरुवात करून स्वतःला सिद्ध करण्याचा काळ समजला जातो. कोणी उत्तम व्यावसायिक शिक्षण घेऊन किंवा स्पर्धा-परीक्षांच्या माध्यमातून चांगल्या नोकरीच्या शोधात असतो. ती मिळाल्यावर विशिष्ट पदोन्नतीसाठी सतत प्रयत्न करतो. तर काहीजण वेळेच्या बंधनांपासून सुटका मिळवण्यासाठी स्वयंरोजगाराची, उद्योजकतेची वाट धरतात. काहीजणांसाठी पूर्वापार चालत आलेल्या कौटुंबिक व्यवसायांची पार्श्वभूमी असते, तर काहीजण पहिल्या पिढीतले उद्योजक होऊन व्यावसायिक प्रगतीची वाटचाल करण्याची स्वप्न बघतात.
नोकरी आणि उद्योजकता यांपैकी निवड करणे हा एक अत्यंत वैयक्तिक निर्णय आहे. नोकरीमध्ये तुम्हाला तुमचा वेळ आणि कौशल्यांच्या बदल्यात एक निश्चित पगार मिळतो, पण तुम्ही स्वतःच्या प्राधान्यक्रमानुसार काम करू शकत नाही. नोकरी देणाऱ्यांच्या मतानुसार प्रत्येक गोष्ट करावी लागते. त्यामुळेच काही वेळा समाजामध्ये मिळणारी प्रतिष्ठा आणि सुरक्षितता की स्वातंत्र्य असा दोलायमान विचार मनात येतो. याउलट व्यवसायात तुम्ही एका उद्योगाचे मालक असता. तुमच्या कमाईची मर्यादा तुम्ही ठरवू शकता. अमर्याद कमाईची क्षमता आणि स्वायत्ततेसाठी स्वीकारावी लागणारी मोठी आर्थिक आणि कार्यात्मक जोखीम मात्र तुम्हाला पत्करावी लागते. तुमची निवड तुमच्या जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेवर आणि जीवनशैलीच्या ध्येयांवर अवलंबून असते. तुम्हाला आवडणारी गोष्ट आणि तुम्ही उदरनिर्वाह कसा करता, या दोन्हींचा संगम साधण्याचे मार्ग तुमच्या ध्येयांनुसार वेगवेगळे असू शकतात. अलीकडच्या काळात उद्योजक (Entrepreneur) होण्यासाठी शैक्षणिक संस्थांमधून व शासकीय पातळीवर खूप प्रोत्साहन दिले जात आहे. स्टार्टअप हा सध्या परवलीचा शब्द झालाय.