निखिल पंडितराव
पत्रकारिता ही एका ध्येयाने प्रेरित होऊन केली जाते. समाजाचे भले करण्यासाठी घेतलेला तो एक वसा असतो. त्या ध्येयाच्या वाटेवर चालताना आरोग्य सांभाळणेही तेवढेच महत्त्वाचे असते. नेमके हेच विसरले जाते आणि मग शरीर अनेक रोगांचे माहेरघर बनते. अशावेळी सकस, संतुलित आहार हाच सर्वांवरील योग्य उपचार आहे. पत्रकारितेमध्ये कार्यरत प्रत्येकाने ‘कराव्या संहार, हवा योग्य आहाराचा आधार’ हे वचन नेहमी ध्यानात ठेवावे.
उदाहरण १
रोहित (नाव बदलले आहे) एका वृत्तपत्रात रात्रपाळीत काम करणारा उपसंपादक. हे उपसंपादक म्हणजे निसर्गाच्या नियमाविरुद्धच काम करत असतात आणि त्यांची जीवनशैलीही तशीच बनून जाते. तशीच रोहितचीही झाली. रात्रपाळीत काम करताना जेवण वेळेत नाही. रात्री एक किंवा दोनला जेवणे, मग घरी जाऊन झोपणे. साहजिकच पित्ताचा त्रास सुरू झाला आणि पित्तापासून होणाऱ्या विविध आजारांनी शरीराला ग्रासले. डॉक्टरांनी सांगितले, लाइफस्टाइल बदला. लाइफस्टाइल बदला म्हणजे एकतर नोकरी सोडणे किंवा कामाच्या स्वरूपात बदल करणे.