बॉन्ड गर्ल्स । प्रसाद नामजोशी
जुडी डेंचच्या नाटकांची, चित्रपटांची आणि त्यासाठी मिळालेल्या पुरस्कारांची नुसती नावं जरी एकाखाली एक लिहिली, तरी दोन पानं भरतील एवढी मोठी कारकीर्द आहे तिची. विकिपीडियाच्या तिच्या पानावरच्या उजवीकडच्या चौकोनात तिची थोडक्यात जी ओळख दिलेली आहे, त्यात ॲवॉर्ड्स या शीर्षकाच्या पुढे ‘फुल लिस्ट’अशी एक नवीन वेगळी लिंक द्यायची वेळ आलेली आहे, यावरून तिच्या दीर्घ कारकिर्दीची व्याप्ती लक्षात यावी!
कसिनो रोयाल या आपल्या पहिल्याच कादंबरीमध्ये ब्रिटिश गुप्तहेर संस्था एमआय सिक्सचा प्रमुख एम आणि त्याची सेक्रेटरी मिस मनीपेनी ही दोन्ही पात्रं जेम्स बॉन्डचा निर्माता इऑन फ्लेमिंगनं आणली होती. मिस मनीपेनी आणि एम या दोन्ही पात्रांना बॉन्ड गर्ल्स मानण्याची तशी पद्धत नाही, तरीसुद्धा या दोघींच्या उल्लेखशिवाय बॉन्ड गर्ल्सची लेखमाला अपूर्ण राहील.
एमआय सिक्स या ब्रिटिश गुप्तचर संस्थेची प्रमुख एम म्हणजे बॉन्डविश्वातली अतिशय महत्त्वाची व्यक्ती. ही फक्त बॉन्डची वरिष्ठ अधिकारी नव्हे, तर वेळप्रसंगी बॉन्डची बेदरकार वागणूक रोखणारं आणि आंतरराष्ट्रीय गुप्त कारवायांचा आवाका असणारं हे व्यक्तिमत्त्व आहे. इऑन फ्लेमिंग ब्रिटिश नौदलात काम करत असताना त्याचे वरिष्ठ रिअर अॅडमिरल जॉन गॉडफ्रे यांच्यावरून त्यानं एमचं पात्र तयार केलं असावं असं बोललं जातं. याविषयी नंतर एवढी जास्त चर्चा झाली, की फ्लेमिंगच्या मृत्यूनंतर गॉडफ्रे चक्क म्हणाले, की त्यानं एमचं पात्र निर्माण करून माझ्या व्यक्तिमत्त्वाला भलताच रंग फसलाय!