लयनकथा । अमोघ वैद्य
घाट उतरताना कातळात खोदलेलं एक आयताकृती लेणं नजरेस पडतं. जुन्नर परिसरातल्या बौद्ध लेण्यांपासून वेगळं असलेलं हे लेणं साधेपणातही गहन आहे. प्रवेशद्वाराशी पाण्याची टाकी, जणू पर्वताच्या हृदयातून झरणारी जीवनधारा. या लेण्याच्या आत मात्र नक्षीकाम किंवा शिल्पांचा मागमूस नाही. तरीही या शांत दालनात काळाच्या गर्भात लपलेलं एक चिरस्थायी सत्य आहे.
सह्याद्रीच्या उभ्या कड्यांमधून, जिथं हिरव्या दऱ्यांतून वाहणारे वारे थकलेल्या पायांना आणि मनाला सुखावतात, तिथं १५व्या शतकात एक परदेशी भटका, अफनासी निकितीन, आपला दीर्घ प्रवास थांबवून विश्रांती घेत होता. रशियाच्या ट्वेर शहरातून निघालेला हा व्यापारी तीन समुद्र पार करत भारताच्या मातीवर पोहोचला, पण त्याचा देह आणि मन दुरून आलेल्या प्रवासामुळं थकलेलं होतं. खड्ड्यांचा रस्त्यानं, खांद्यावरच्या सामानानं आणि सूर्याच्या तापानं त्याला हैराण केलं होतं.
महाराष्ट्र कोणाला असा नाराज करत नाही, सह्याद्रीच्या कातळांवरून नजर फिरवताच त्याचं मन बदललं. डोंगरांच्या खोऱ्यात हिरव्या झाडांची सावली, खळखळणाऱ्या झऱ्यांचा नाद आणि कातळात कोरलेली प्राचीन शिल्पं जणू त्याला नवं बळ देत होती! सातवाहन काळात त्या मार्गावर गजबजलेल्या व्यापारी टोळ्यांचे पडसाद त्याला जणू ऐकू येत होते. त्याच्या नजरेसमोर जणू उभी होती भारताची समृद्ध संस्कृती! बाजार, मंदिरं आणि कातळातल्या गूढ लेण्या! कोकणाला बाकीच्या महाराष्ट्राशी जोडणारा तो प्राचीन मार्ग त्याच्यासमोर इतिहास आणि वर्तमान जोडत होता.