

Kaas Plateau Flower Valley
esakal
डॉ. संदीप श्रोत्री
कास पठार पर्यावरणाचे मंदिर आहे, निसर्गप्रेमी पर्यटकांनी या जैवविविधतेच्या मंदिराचा आदरपूर्वक आनंद अाणि उपभोग घ्यायला हवा. आपला आनंद दुसऱ्याच्या पोटावर पाय देणारा नसावा याचे भान ठेवायला हवे; मग ती येथील चिमुकली, औटघटकेचे आयुष्य लाभलेली गवतफुले असली, तरी त्यांना तुडवणे हादेखील अपराध मानला जावा.
लहानपणापासूनच कास पठारापेक्षा कास तलाव आणि त्याभोवतीचे जंगल हे आमचे अत्यंत आवडीचे सहलीचे ठिकाण होते. शाळेच्या सहलीमध्ये हमखास दरवर्षी ‘कास तलाव’ असायचाच; विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्टीत तेथील लेंडी जांभळे आणि करवंदे हा रानमेवा खाण्यासाठी! पण त्यावेळी सड्यावरील पुष्पवैभव मात्र माहितीच नव्हते. कास पठार आणि तेथील सुंदर रंगीत फुले यांचे डोळस दर्शन झाले ते चाळीस वर्षांपूर्वी. माझ्या वैद्यकीय प्रवेशानंतर, म्हणजे १९८२मध्ये, डॉ. संजय लिमये या मित्राने कास पठाराचे महत्त्व सांगितले होते. त्यानेच ह्या ‘पुष्पवैभवा’चे अनोखे दर्शन घडवून आणले. पण झाले असे, तो काळ माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा होता, माझे पुढील शिक्षण आणि स्थैर्य ही माझी प्राथमिक गरज होती. त्यामुळे अर्थातच माझे संजय काय सांगतो त्याकडे दुर्लक्ष झाले.