

Kalijphool Book
esakal
सुनील शिनखेडे
या संग्रहातील लेखांचे वैशिष्ट्य म्हणजे वरवर साधे वाटणारे अनुभव लेखविषय झाले असले, तरी त्यातून एकेक अद्भुत व अनोखी कहाणी साकारली जाते. लेखिकेला माणसे वाचण्याची, त्यांना समजून घेण्याची असोशी आहे. त्यामुळेच संपर्कात आलेल्या, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल त्यांना कुतूहल असते. या पुस्तकातील लेखांचे विषयानुसार वर्गीकरण करून विभाग केले असते, तर वाचनानंदाची लय अधिक सुरेल झाली असती.
मन संवादी, संवेदनशील आणि सकारात्मक असले की त्याचे नितळ प्रतिरूप लेखनात उमटल्याशिवाय राहत नाही. लेखिका वर्षा किडे-कुळकर्णी यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या काळीजफूल पुस्तकातील ललितलेख वाचल्यावर याचा प्रत्यय येतो. चाळीस लेखांचा हा संग्रह. त्यातील प्रत्येक लेख म्हणजे रसरशीत अनुभव. लेखांत ज्या पद्धतीने भावजीवन उलगडत जाते, ते वाचताना वाचकही त्या भावविश्वाचा भाग होऊन जातो. वैयक्तिक अनुभवांचा सहजस्फूर्त आविष्कार सर्वस्पर्शी होत जात लेखिका आणि वाचक यांच्यात अनुबंध निर्माण करतो. याचे श्रेय लेखिकेच्या प्रांजळ आणि संवादी शैलीला द्यायला हवे.