

Kant Human Nature
esakal
डॉ. सदानंद मोरे
भारतीय साहित्यशास्त्राच्या परंपरेत ग्रंथात अभिप्रेत असलेला विचार ज्या शैलीने व्यक्त करता येतो, त्यानुसार एक वर्गीकरण करता येते. त्यातील दोन प्रकार म्हणजे शास्त्रनय आणि काव्यनय. येथे कांट ज्याला Logical Perfection म्हणतो त्यासाठी शास्त्रनय आणि जे कलात्मक Aesthetic Perfection म्हणतो त्यासाठी काव्यनय हे शब्दप्रयोग अर्थहानी होऊ न देता करता येतील. स्वतः कांटला या Aesthetic Geniusची जोड मिळाली असती, त्याच्या प्रतिभेला रसस्पर्श झाला असता, म्हणजेच तो प्रतिभावंत कवी असता तर?
तत्त्वज्ञानाच्या मुख्य प्रवाहातील बहुतेक अभ्यासकांकडून कांटच्या मानवमीमांसाकडे म्हणजेच ‘Anthropology’कडे दुर्लक्ष झाले असल्याने त्यासंदर्भात राबेलोची उद्विग्न प्रतिक्रिया समजून घेता येण्यासारखी आहे. मात्र याचा अर्थ असा नाही, की तिकडे कोणीच लक्ष दिले नाही. कांटच्याच क्रिटिकल परंपरेतील मानल्या जाणाऱ्या दोघांची नावे उल्लेखित व्हायलाच हवीत. कांटला अनुसरून Critique of Historical reasonची मांडणी करणारा विल्यम डिल्थी आणि अमेरिकी कांटवादी अर्न्स्ट कॅझिरर ही ती नावे होत. अगदी अलीकडचे नाव सांगायचे झाल्यास, अर्थातच उत्तराधुनिक विचारवंत मानला जाणारा मिशेल फूको. फूकोने पीएच.डी.साठीचे लेखन १९६१मध्येच पूर्ण केले असले, तरी तो प्रबंध प्रत्यक्षात प्रकाशित होण्यासाठी २००८पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान १९६४मध्ये त्यानेच केलेले कांटच्या Anthropology from a pragmatic point of view या पुस्तकाचे फ्रेंच भाषांतर प्रकाशित झाले होते.
कांटची प्राथमिकता जरी सार्वत्रिकता (Universality) आणि अनिवार्यता (अर्थात तार्किक) ही असली, तरी यांचा वाहक जो मानवप्राणी तो बुद्धीव्यतिरिक्त (Reason) अन्य आंतरिक घटकांनी घडलेला असतो. शिवाय तो बाह्य भौतिक विश्वात वावरणारा असतो. या दोन्हीही गोष्टी समजून घेतल्याशिवाय माणूस पूर्ण समजला असे होत नाही. शिवाय त्याने काय करावे आणि त्याच्या करण्याच्या म्हणजेच कृतीच्या मर्यादा समजून घेणेही तितकेच आवश्यक असते. आपल्याकडील परिभाषा वापरून सांगायचे झाल्यास, मनुष्य आध्यात्मिक आणि आधिभौतिक आहे. अध्यात्म म्हणजे त्याचे शरीर-मनासह अस्तित्व; स्वभाव आधिभौतिक म्हणजे पंचमहाभूतांपैकी युक्त असलेला त्याचा देह; पण त्याचे बाह्य जग हेसुद्धा याच भौतिक घटकांनी सिद्ध झालेले आहे. म्हणजेच त्याच्या देहमनोबुद्धी यांनी सिद्ध झालेल्या अस्तित्वातील स्व-भावातील एक घटक आधिभौतिक (देह) असतो. साहजिकच तो एकाच वेळी दोन प्रकारच्या विश्वांत वावरतो. भौतिक (ज्याला आपण निसर्ग म्हणतो), की जे नियमबद्ध असते व ज्याच्या नियमिततेच्या मुळाशी असलेले वैज्ञानिक नियम न्यूटनने कांटपूर्वी उजेडात आणले होते. जोपर्यंत मानव या भौतिक विश्वाचा हिस्सा आहे, तोपर्यंत त्यालाही निसर्गातील इतर वस्तूंप्रमाणे त्यांच्या आधीन राहावे लागते. या विश्वात वर्चस्व अर्थातच नियमिततेचे (Regularity) असते.