चंद्रशेखर जोशी
त्याचं झालं असं, आमची नजर जरी फार चांगली नसली, तरी पहिल्या नजरेतच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो! लव्ह ॲट फर्स्ट साइट का काय असतं ते... दिल की घंटी बज गयी! आणि तुम्ही ठेवलेलं त्याचं नावही योग्य आहे, आहेच तो पुरुषोत्तम! गेंडोत्तम म्हणा हवं तर... शिवाय सिक्स्थ सेन्स नावाची काही चीज असते की नाही?... तिलोत्तमा सांगत होती.
पुरुषोत्तम मला प्रथम आणि शेवटचा भेटला तेव्हा तो खाली मान घालून आपलं सर्वात आवडतं आणि महत्त्वाचं काम करत होता.
तिलोत्तमाही थोड्याच अंतरावर तेच करत होती, फक्त तिचा एक डोळा माझ्यावर असावा असं मला वाटलं. आजूबाजूचा आसमंत सकाळच्या कोवळ्या उन्हानं उबदार झाला होता. आम्ही तिघं ब्रह्मपुत्रा नदीच्या एका उपनदीच्या काठावर उभे होतो. सर्वत्र हिरवंगार गवत वाढलेलं होतं. हिरव्या रंगाच्या अनेक छटा पाहायला मिळत होत्या.
वेगवेगळी झाडं-झुडुपं, हत्ती गवत आणि नदीच्या पाण्याचा आवाज अंतःकरणाला सुखावत होता. वाळून नदीच्या मधोमध आडव्या पडलेल्या एका झाडावर काही कासवं ऊन खात पहुडली होती. हरणं, माकडं, ससे आपापल्या दिवसाची सुरुवात करत होते.
पुरुषोत्तमासमोर मी जीव मुठीत किंवा पोट मुठीत घेऊन उभा होतो, कारण मी उभा होतो तिथून माझं पोट थेट त्याच्या एकमेव शिंगाच्या रेंजमध्ये येत होतं. त्यानं दोन पावलं पुढे होऊन मान नुसती वर केली असती, तरी मी थेट प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचलो असतो...
कामाख्या देवीचं दर्शन घेऊन आमची गाडी काझीरंगाच्या रस्त्याला लागली होती. दुतर्फा उंच झाडांची महिरप आणि बांबूंपासून तयार केलेल्या वस्तूंची दुकानं, थंडगार हवा, तुरळक रहदारी आणि मराठमोळ्या सुनील गावस्करांचा हसतमुख चेहरा असलेली असंख्य होर्डिंग्स.
गाडीनं वेग घेतला तसा विचारांचा वेगही वाढला. शक्य झालं तर गेंड्यांच्या एका जोडीची मुलाखत घेण्याची इच्छा होत होती. हा ‘शब्देविण संवाद’ सोहळा कसा रंगणार हा प्रश्न माझ्या शास्त्री नावाच्या लोकलमधल्या मित्रानं सोडवला होता. ते नेहमी सोलो चेस खेळत असत आणि दोन्ही बाजूच्या चाली स्वतःच करत असत.
मुलाखतीची इच्छा मनात येण्याच्या चक्क दुसऱ्याच दिवशी माझी ‘पुरुषोत्तम’शी भेट झाली... मी हळूच माझ्या मनातल्या प्रश्नांची काडेपेटी उघडू लागलो. अर्थातच त्याला काही प्रश्न विचारण्याआधीच मी त्याचं नामकरण करून मोकळा झालो होतो.