

Rajasthan and Agra Tourism Places
esakal
जवळचे शहर : भरतपूर
जवळचे विमानतळ : पंडित दीनदयाळ उपाध्याय विमानतळ, आग्रा
जवळचे रेल्वेस्थानक : भरतपूर
जवळचे बसस्थानक : भरतपूर
केव्हा जाल? : डिसेंबर ते एप्रिल
वारसास्थळाची वैशिष्ट्ये : राजस्थान राज्यात वसलेले हे राष्ट्रीय उद्यान ‘भरतपूर पक्षी अभयारण्य’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. या भागातील एका प्राचीन शिवमंदिरावरून या अभयारण्याचे ‘केवलादेव’ असे नामकरण झाले. १० मार्च १९८२पासून या प्रदेशास वन्यजीव संवर्धन क्षेत्राचा दर्जा मिळाला व यास राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले. या प्रदेशास ‘पक्ष्यांचा स्वर्ग’ असे म्हटले जाते, कारण येथे पक्ष्यांच्या सुमारे ३७५ प्रजातींचे संवर्धन केले जाते. तसेच इतर अनेक वन्यजीवही या गवताळ, जंगली, दलदली आणि पाणथळ प्रदेशाच्या पट्ट्यात आढळतात. हे राष्ट्रीय उद्यान स्थलांतरित पक्ष्यांच्या मध्य आशियाई उड्डाणमार्गाच्या मध्यभागी आहे. उद्यानाच्या मोक्याच्या ठिकाणामुळे आणि मुबलक पाणथळींच्या अस्तित्वामुळे अनेकविध पक्ष्यांच्या प्रजाती या उद्यानाकडे हिवाळ्यात स्थलांतरित होतात. हिवाळ्यात बदक, हंस, कुट, पाणकोळी (पेलिकन) आणि वॅडर या पक्ष्यांचे मोठे समूह येथे येतात. हे उद्यान अत्यंत दुर्मीळ असलेल्या सायबेरियन क्रेन या पक्ष्याच्या मध्यवर्ती संख्येचे एकमेव ज्ञात हिवाळी ठिकाण आहे. ग्रेटर स्पॉटेड ईगल आणि इम्पेरियल ईगल यांसारख्या जागतिकदृष्ट्या लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींसाठी हिवाळ्यात विसाव्याचे स्थान म्हणूनही हे उद्यान कामी येते. प्रजनन हंगामात या प्रदेशातील बगळे, आयबिस, पाणपक्षी (कॉर्मोरंट्स), स्पूनबिल आणि करकोचा अशा अनेक नेत्रदीपक प्रजाती बघावयास मिळतात. मोठा पूर येतो त्या वर्षात सुमारे वीस हजारांहून अधिक पक्षी उद्यानात घरटी बांधतात.