

Khavda Pottery Art and Crafts Gujarat
esakal
जी डिझाईन्स खवडामधल्या कारागिरांच्या पिढ्या हजारो वर्षं काढत आल्या आहेत, तीच डिझाईन्स इथले कारागीर आजही वापरतात. लाल रंगावर भौमितीय आकारांचं काळं-पांढरं नक्षीकाम ही खवडा पॉटरीची ओळख आहे. मुलांच्या खेळण्यांपासून, ताटल्या, पसरट वाडगे, ताक ठेवण्याकरता कुल्हड अशा घरगुती वापराच्या वस्तू आणि पूजेसाठी कितीतरी वस्तू हे कारागीर तयार करतात.
माती हा आज आपल्यालेखी केवळ एक भौगोलिक घटक राहिला असला किंवा बांधकामाकरता आवश्यक साहित्य म्हणून त्याची गणना केली जात असली, तरी प्रत्यक्षात तो सृष्टीतला एक जिवंत घटक आहे. अनेकदा माणसाचा संदर्भ देतानाही मातीचा उल्लेख केला जातो. माणसाच्या जन्म-मृत्यूशी निगडित विधींमध्येही मातीच्या घटाची उपस्थिती अनिवार्य असते. ‘माती असशी, मातीत मिळशी...’सारख्या ओळी असोत किंवा ‘फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार...’सारखं गीत असो, माती आणि माणूस एकच असल्याचा प्रत्यय सगळ्या भारतीय भाषांमधल्या साहित्यानं वारंवार दिला आहे. गुजराती भाषेतही अनेक म्हणी आणि समजुती माती व माणसातलं घट्ट नातं अधोरेखित करणाऱ्या आहेत. एखाद्याला जन्मतः एखादा अवयव नसला, तर देवाला माती कमी पडली, असं गुजरातीत म्हटलं जातं. याचं कारण सर्जनाच्या मुळाशी माती आणि पाणी असल्याचा विश्वास भारतीय परंपरेनं बाळगला आहे.