विश्वाचे आर्त । डॉ. सदानंद मोरे
किपलिंगच्या कवितेला विरोध होण्यासाठी शतकांपेक्षा अधिक थांबायची आणि कृष्णवर्णीयांमध्ये आत्मभान व जागृती होण्याची गरज नव्हती. ‘White Man’s Burden’च्या विरोधात ती प्रसिद्ध झाल्यापासूनच तिला विरोध होत होता. तो करण्यात गौरवर्णीय ब्रिटिश व अमेरिकीही सामील होते. त्यांच्यात सर्वात महत्त्वाचा मार्क ट्वेन.
कवी किपलिंगने कवितेतून केलेल्या आवाहनामुळे अमेरिकी विस्तारवादाला एक प्रकारचे समर्थन मिळाले, हे कोणीच नाकारू शकत नाही. इंग्लंड हे राष्ट्र उघडउघड, डोळ्यांत भरण्याइतकेच नव्हे तर डोळ्यांत खुपण्याइतके विस्तारवादी व वसाहतवादी राष्ट्र बनले होते, तेव्हा त्याच्यासाठी किपलिंग किंवा अन्य कोणी समर्थन किंवा दिलगिरी (Apology) व्यक्त केली काय आणि न केली काय, फारसा फरक पडणार नव्हता. अमेरिकेचे तसे नव्हते. मुळात अमेरिका (यूएसए) नावाने राष्ट्र निर्माण झाले, तेच मुळी इंग्लंडच्या या अशा धोरणाविरुद्ध बंड करून. भले नंतरच्या काळात अमेरिकेने आंतरराष्ट्रीय राजकारणापासून स्वतःला दूर ठेवले असेल, पण तात्त्विक पातळीवर इंग्लंडच्याच काय, पण कोणाच्याही विस्तारवादी धोरणाला, इतरांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याच्या प्रवृत्तीला मान्यता वा प्रोत्साहन देणे हा मोठाच विरोधाभास ठरला असता. तो त्याने टाळला.
इंग्लंडच्या बाबतीत अशा प्रकारची तत्त्वचर्चा निदान शक्य तरी होती. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतामधील ईस्ट इंडिया कंपनीच्या जुलमी कारभाराचे कसे वाभाडे काढले जात, क्लाईव्ह, हेस्टिंग्ज यांच्यासारख्या राज्यकर्त्यांना कसे धारेवर धरले जाई, हे आपण जाणतोच. स्पेन किंवा पोर्तुगाल यांसारख्या राष्ट्रांमध्ये अशी चर्चाही होत असल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे फिलिपिन्समधील स्थानिकांनी स्पॅनिश राजवटीविरुद्ध बंड केले, तेव्हा त्यांना पाठिंबा व मदत देणाऱ्या अमेरिकेच्या हेतूबद्दल कोणालाही संशय येणे शक्य नव्हते. अमेरिका फिलिपाइन स्वातंत्र्ययोद्ध्यांना सैन्यबळासह सर्व प्रकारची मदत करीत आहे, ती केवळ परोपकार बुद्धीने फिलिपिनी स्थानिकांचे स्पेनकडून हिरावले गेलेले स्वातंत्र्य त्यांना परत मिळवून देण्यासाठी, अशीच साधारण समजूत होती.