संतोष मिठारी
प्लॅस्टिक म्हटलं की सर्वांत पहिल्यांदा डोळ्यांसमोर येतो तो त्यामुळे निर्माण होणारा कचरा, आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या. औद्योगिक, व्यापार-व्यवसायाच्या क्षेत्रांत प्लॅस्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनाची समस्या दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेडने पर्यावरणपूरक पाऊल उचलत या प्लॅस्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचे मॉडेल सर्वांसमोर आणले आहे. येथे दर महिन्याला दीड टन प्लॅस्टिक कचऱ्यातून तेराशे लिटर डिझेल आणि तीनशे किलो गॅसनिर्मिती होते.
कोल्हापूर जिल्ह्यात कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड या कंपनीचा प्रकल्प आहे. या कंपनीमध्ये ऑइल इंजिनच्या निर्मितीसाठी लागणारे ओरिंग, प्लॅस्टिक गॅसकीट, इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट असे सुट्टे भाग पुरवठादारांकडून प्लॅस्टिकमध्ये पॅक होऊन येत होते.