west indies cricket politics
west indies cricket politicssakal

विंडीजमधील बुडणारे क्रिकेट

विश्वकरंडकासाठी पात्र ठरू न शकलेल्या संघाची निराशाजनक, स्फूर्तिहीन मोहीम लक्षात घेता, सेहवागचे मतप्रदर्शन पटणारे आहे.

विश्वकरंडकासाठी पात्र ठरू न शकलेल्या संघाची निराशाजनक, स्फूर्तिहीन मोहीम लक्षात घेता, सेहवागचे मतप्रदर्शन पटणारे आहे...

भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या म्हणण्यानुसार, वेस्ट इंडीज क्रिकेटमधील अंतर्गत विभागीय राजकारण खेळाला मारक ठरत आहे. विश्वकरंडकासाठी पात्र ठरू न शकलेल्या संघाची निराशाजनक, स्फूर्तिहीन मोहीम लक्षात घेता, सेहवागचे मतप्रदर्शन पटणारे आहे.

एक काळ असा होता, जेव्हा क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीज संघाचे नाव घेताच प्रतिस्पर्धी संघाला कापरे भरायचे, मैदानात उतरण्यापूर्वीच त्यांचे अर्धे अवसान गळायचे. उत्तर अटलांटिक महासागर आणि कॅरिबियन समुद्राचा सहवास लाभलेल्या वेस्ट इंडीज बेटांवरील क्रिकेट अतिआक्रमकतेसाठी ओळखले जात होते.

कॅरिबियन द्वीपसमूह मिळून वेस्ट इंडीज क्रिकेट तयार झाले. प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या शरीराचा वेध घेणारी तेजतर्रार गोलंदाजी, बिनधास्त आणि तुफानी फलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण या बळावर १९८०च्या दशकापर्यंत विंडीज क्रिकेटने जागतिक मैदाने गाजविली. मात्र त्यानंतर तेथील क्रिकेटला ओहोटी लागली. प्रथितयश खेळाडू निवृत्तीच्या कुशीत शिरले. १९९०च्या दशकात आणखी गुणसंपन्न क्रिकेटपटूंची पिढी मैदानावरून मागे फिरली आणि नव्या सहस्रकात विंडीज क्रिकेटची आणखीनच वाताहत झाली.

विंडीज क्रिकेटपटूंना टी-२०सारख्या झटपट क्रिकेटची जास्त आवडू लागले. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये त्यांचा लौकिक पार मातीमोल झाला. एकदिवसीय क्रिकेटमध्येही पीछेहाट सुरू झाली. फक्त टी-२० क्रिकेट खेळण्यात धन्यता मानणारे कॅरिबियन क्रिकेटपटू फ्रँचायजी क्रिकेटमध्ये मौल्यवान ठरू लागले. वेस्ट इंडीज क्रिकेटऐवजी त्यांना फ्रँचायजी क्रिकेट अधिक जवळचे वाटू लागले. सारा खेळ पैशांचा.

मात्र या गोंधळात कॅरिबियन बेटांवरील कॅलिप्सो क्रिकेट बेसूर झाले. मानधन करारावरून खेळाडू आणि विंडीज मंडळ यांच्यात उडणारे खटके नित्याचेच झाले. विंडीज क्रिकेटच्या ध्वजाखाली खेळण्यात क्रिकेटपटूंना धन्यता वाटेनाशी झाली, तो अभिमान लुप्त झाला. त्याऐवजी फ्रँचायजी संघाद्वारे टी-२० क्रिकेटमधील पैसे कमवण्याकडे कल झुकू लागला.

या प्रकरणी सारा दोष क्रिकेटपटूंनाही देऊन चालणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाप्रमाणे वेस्ट इंडीज क्रिकेट काळाची पावले ओळखू शकले नाही. खेळाडू आणि मंडळातील भांडणामुळे चांगले खेळाडू संघापासून दूर गेले. नुकसान विंडीज क्रिकेटचेच झाले, त्यामुळेच त्यांना यंदा भारतात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरता आले नाही.

विंडीज क्रिकेट, खेळाडू आणि चाहत्यांसाठी हा जबर धक्का आहे. कॅरिबियन बेटावरील बुडणारे क्रिकेट लोकाश्रयापासून दूर जात आहे. प्रस्थापितांसह नवोदितांनाही विंडीज संघाऐवजी फ्रँचायजी क्रिकेट जास्त आकर्षित करते. प्रतिकूल परिस्थिती अशीच कायम राहिली, तर भविष्यात विंडीज संघ इतिहासजमा होऊन तेथील खेळाडू फक्त जगभरातील टी-२० लीग क्रिकेटच खेळताना दिसल्यास नवल वाटू नये!

४८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच....

एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेला १९७५ साली सुरुवात झाली, म्हणजेच आता ४८ वर्षे झाली आहेत. एवढ्या वर्षांच्या इतिहासात प्रथमच वेस्ट इंडीज क्रिकेट संघ विश्वकरंडक स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. ही कॅरिबियन क्रिकेटची शोकांतिका आहे. विश्वकरंडकाच्या पहिल्याच स्पर्धेत वेस्ट इंडीज संघ जगज्जेता ठरला.

त्यानंतर चार वर्षांनी, १९७९मध्ये त्यांनी जगज्जेतेपद राखले. मात्र १९८३ साली ज्यांना कमजोर मानले गेले होते त्या, कपिल देवच्या नेतृत्वाखालील, भारतीय संघाने ऐतिहासिक लॉर्ड्‌सवर विंडीजचे गर्वहरण केले. तो झटका फार जबर ठरला. त्यानंतर वेस्ट इंडीजला एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वकरंडकाची अंतिम फेरी एकदाही गाठता आली नाही. १९९६मधील उपांत्य फेरी ही त्यांची स्पर्धेतील शेवटची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

काळाच्या ओघात कॅरिबियन बेटांवर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटला मरगळ आली आणि टी-२० क्रिकेटचाच जयजयकार होऊ लागला. त्याचे पडसाद टी-२० विश्वकरंडकात उमटले आणि डॅरेन सॅमी याच्या नेतृत्वाखाली विंडीजने २०१२ व २०१६मध्ये जगज्जेतेपद पटकावले. काळाचा महिमा पाहा...

ज्या सॅमीने विंडीजला टी-२० क्रिकेटमध्ये दोन वेळा विश्वविजयी बनविले, त्याच माजी कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली झिंबाब्वेत झालेल्या विश्वकरंडक पात्रता फेरीत वेस्ट इंडीज संघ अपयशी ठरला. आयसीसीच्या प्रमुख स्पर्धेसाठी पात्र न ठरण्याची विंडीजची ही दुसरी वेळ होय.

त्यांनी २००४ साली चँपियन्स ट्रॉफी जिंकली, या स्पर्धेत १९९८ व २००६ साली ते उपविजेते ठरले; पण २०१७ साली त्यांना या स्पर्धेची पात्रता मिळविता आली नाही. आतासुद्धा १० संघांच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी विंडीजला आवश्यक मानांकन राखता आले नाही.

यजमान भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान हे आठ संघ थेट पात्र ठरले. माजी विजेत्या श्रीलंका व विंडीजला पात्रता फेरीत खेळावे लागले. श्रीलंकेने धक्के बसणार नाहीत याची दक्षता घेत अगोदरच्या चुकांची दुरुस्ती केली आणि यावर्षी ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या विश्वकरंडकासाठी पात्रता मिळविली, पण मरगळलेल्या विंडीजची दैना उडाली.

पात्रता फेरीतून विश्वकरंडकासाठीच्या दोन जागांसाठी श्रीलंका, विंडीज व झिंबाब्वे यांच्यात चुरस होती. मात्र शेई होप याच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीज संघाला अनुभवाच्या दृष्टीने कमकुवत असलेल्या संघांकडून हार स्वीकारावी लागली. नेदरलँड्सने त्यांना सुपर ओव्हरमध्ये हरविले. त्या लढतीत ३७४ धावा करून विंडीजच्या संघावर पराभवाची नामुष्की आली.

स्कॉटलंडविरुद्धच्या पराभवात त्यांना दोनशे धावाही पार करता आल्या नाहीत. फलंदाजी व गोलंदाजी सुमार ठरलीच, क्षेत्ररक्षणही अत्यंत गचाळ ठरले. त्यामुळेच सॅमीने आपल्या संघाची जाहीर अवहेलना केली.

टी-२० स्पर्धेतून पैशांचा ओघ

जगभरातील श्रीमंत फ्रँचायजी लीग क्रिकेटमध्ये बेधडक खेळ करणाऱ्या कॅरिबियन क्रिकेटपटूंना मोठी मागणी आहे. भारतातील आयपीएलमधील संघांसाठी ते मॅचविनर आहेत, त्यामुळे त्यांचा भावही खूपच वधारलेला आहे.

यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेत शिमरॉन हेटमायर राजस्थान रॉयल्सतर्फे खेळला. उपलब्ध माहितीनुसार, या धडाकेबाज फलंदाजासाठी राजस्थान रॉयल्सने वार्षिक साडेआठ कोटी रुपये शुल्क मोजले. दुसरीकडे विंडीजच्या आंद्रे रसेल या हुकमी अष्टपैलूला कोलकाता नाईट रायडर्सने १६ कोटी रुपयांत राखले.

हे दोघेही आयपीएल स्पर्धेत चमकले, पण ते विश्वकरंडक पात्रता फेरीतील विंडीज संघात नव्हते. सुनील नारायण जगभरातील लीग क्रिकेटमध्ये पहिल्या पसंतीचा खेळाडू आहे, मात्र तो विंडीज संघाच्या पोशाखात दिसत नाही. नावलौकिक मिळवलेल्या खेळाडूंना वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाच्या अधिकृत करार यादीतही स्थान नको असते.

निकोलस पूरन याच्यासाठी आयपीएल स्पर्धेतील लखनौ सुपर जायंट्सने १६ कोटी रुपये मोजले. तो मॅचविनिंग फटकेबाज फलंदाज आहे. जगभरात त्याला मागणी आहे. त्यामुळे तो भविष्यात विंडीज संघातून अंग काढून घेऊ शकतो. खेळाडूंच्या मानधन मुद्द्यावरून विंडीज मंडळ सुस्त आहे.

त्यामुळे जागतिक लीग मैदानावर चमकणारे त्यांचे क्रिकेटपटू विंडीज संघासाठी जीव तोडून खेळताना दिसत नाहीत. व्हिटॅमिन एम... अर्थात पैसा वरचढ ठरल्यामुळे विंडीज क्रिकेटच्या गळचेपीसाठी खेळाडूंनाही कारणीभूत धरता येणार नाही. इतर देशांतील क्रिकेटपटूही लीग क्रिकेटमध्ये झळकतात, त्याचवेळी ते राष्ट्रीय संघासाठी सर्वस्व अर्पून खेळताना दिसतात.

ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कला आयपीएल क्रिकेटमधील पैशांऐवजी देशातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट धन्य वाटले. भारतीय क्रिकेटपटूही आपल्या मंडळाकडून मिळणाऱ्या मानधनावर संतुष्ट आहेत. मात्र वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळावर त्यांचे खेळाडू स्तुतिसुमने उधळताना अजिबात दिसत नाहीत.

भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या म्हणण्यानुसार, वेस्ट इंडीज क्रिकेटमधील अंतर्गत विभागीय राजकारण खेळाला मारक ठरत आहे. विश्वकरंडकासाठी पात्र ठरू न शकलेल्या संघाची निराशाजनक, स्फूर्तिहीन मोहीम लक्षात घेता, सेहवागचे मतप्रदर्शन पटणारे आहे. कॅरिबियन क्रिकेटपटूंना आता विंडीज क्रिकेटप्रती अजिबात अभिमान वाटत नाही हे सत्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com