
डॉ. सदानंद मोरे
परिस्थितीनुसार आपल्यात बदल घडवून आणणे हे साधारणपणे प्राणिसृष्टीचे जीवनसूत्र म्हणावे लागते. मानवाचे वैशिष्ट्य म्हणजे तो परिस्थितीत बदल घडवून ती आपल्याला अनुकूल करून घेऊ शकतो. अर्थात, हे त्याला कर्माच्या साह्याने किंवा कर्माने करावे लागते. या प्रकारच्या कर्माला पुरुषार्थ असे म्हणायला हरकत नाही. इतिहासात हेन्री किसिंजर महत्त्वाचा ठरतो. कारण त्याने अशा प्रकारे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कर्माचे वर्णन एखाद्याला दूतकर्म असे करावेसे वाटले तर हरकत नाही. मात्र किसिंजर केवळ निरोप्या नव्हता. कारण दूतकर्माच्या मागील धोरणही त्यानेच ठरवले होते. राष्ट्राध्यक्ष निक्सनला ते धोरण पटवून देऊन त्याच्या संमतीनेच तो दूतकर्मासाठी बीजिंगकडे रवाना झाला होता.