
नंदिनी नरेवाडी
घटस्फोट घेण्याची वेळ येते, त्यावेळी संबंधित व्यक्तीच्या मनात बऱ्या-वाईट भावनांचा कल्लोळ असतो. एकाचवेळी भावनिक, आर्थिक आणि सामाजिक पातळीवर एका दिव्यातून सामोरे जावे लागते. मित्र-मैत्रिणींचे, आप्तेष्टांचे सुखी संसार पाहून, त्यांचे लग्नसोहळे पाहून माझ्याच वाट्याला हे दुःख का, असा विचार मनात घोळत राहतो. मुलांवर अन्याय करतोय का? अशी अपराधीपणाची भावनाही निर्माण होते. न कमवत्या व्यक्तीसमोर आर्थिक परिस्थिती कशी हाताळायची, असा प्रश्न उभा ठाकतो. या सगळ्या ताणतणावाचा परिणाम नंतर तब्येतीवर जाणवू लागतो. अशा परिस्थितीला सामोऱ्या जाणाऱ्या स्त्री-पुरुषांना नव्याने जगण्याची उमेद देताहेत कोल्हापुरातील ॲड. आकांक्षा कोल्हापुरे.