

Kolhapur’s Football Fever
esakal
आम्ही कोल्हापुरी जगात भारी... खरेच आम्ही जगात भारी आहोत. कोल्हापुरात फुटबॉल फीव्हर एवढा आहे, की मेस्सी, नेमार, रोनाल्डोची ३० फुटी पोस्टर्स येथे पाहायला मिळतात. येथील ‘एमएच ०९’ हा गाडीचा क्रमांक अमेरिकेतील अटलांटामध्येही बघायला मिळतो! जर्मनीतील स्टुटगार्टमध्ये कोल्हापुरातील मुलीने सुरू केलेल्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या कोल्हापुरी तांबडा-पांढऱ्या रश्श्याला मागणी आहे. कोल्हापुरातील एक व्यक्ती अमेरिकेत मल्लखांबाचे प्रशिक्षण देत आहे. असे किती अन् काय सांगावे... म्हणून म्हटले जाते, ‘आम्ही कोल्हापुरी जगात भारी...’
कोल्हापूर... सिर्फ नाम ही काफी है! दिलदार अन् रांगडे, मदतीला धावून जाणारे, मैत्री निभावणारे कोल्हापूरकर... एखाद्याची रिक्षा बंद पडली, तर दुचाकीवरून रिक्षाला पाय लावून पुढे नेणारे कोल्हापूरकर असतात. परदेशात फुटबॉल सामने होत असताना त्याचा फीव्हर काय असतो हे पाहायला कोल्हापुरातच यावे लागते. कोसो दूर झालेल्या फिफाचा माहोल कोल्हापुरातच दिसतो. यावर्षी तर प्रसिद्ध खेळाडूंचे ३०-३० फुटी कटआऊट्स कोल्हापुरात झळकत होते. वेगवेगळ्या देशांचे झेंडे कोल्हापुरातल्या गल्ल्यांमध्ये फडकत राहिले. हे फुटबॉलचे प्रेम कोल्हापूरकर परदेशीही घेऊन गेले आहेत. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील माजी आमदार मालोजीराजेंसह सुमारे शंभरहून अधिक फुटबॉलप्रेमींनी परदेशात जाऊन फुटबॉलचा आनंद घेतला आहे. शासनाच्या मित्रा संस्थेत अधिकारी असलेल्या शिवनेरी फुटबॉल क्लबचे खेळाडू क्षितिज देसाई यांनी लिओनेल मेस्सीच्या भारतदौऱ्यादरम्यान नियोजनात सहभाग घेतला होता. ते दिवसभर त्याच्यासोबत राहिले होते. पृथ्वी गायकवाड, निखिल कदम, आर्यन चौगले यांनी मेस्सीसोबत फुटबॉल सामना खेळण्याचाही आनंद घेतला, त्याच्याकडून खेळाच्या टिप्स घेतल्या.
‘आम्ही कोल्हापुरी जगात भारी’ असे उगाच म्हटले जात नाही. त्याला कारणेही तशीच आहेत. येथील प्रत्येकाला आपल्या मातीचा, रांगड्या व्यक्तिमत्त्वाचा अभिमान आहे. आतून-बाहेरून जसे आहेत तसे असणारे कोल्हापूरकर केवळ महाराष्ट्रात आणि भारतातच नव्हे, तर जगभरात कोल्हापूरचे नाव गाजवत आहेत. शरीराने कोल्हापूरपासून कितीही दूर असले, तरी इथली संस्कृती आणि संस्कार जपण्याचा प्रयत्न परदेशात राहणारे कोल्हापूरकर करत असतात. ‘आम्ही कोल्हापूरकर नोकरीनिमित्त परदेशात असलो, तरीही आमची आन-बान-शान कोल्हापूर आहे,’ असे छातीठोकपणे सांगतात.