

Traditional Maharashtrian Jewellery
esakal
नंदिनी नरेवाडी
महाराष्ट्राच्या पारंपरिक सुवर्णवैभवाचा अनमोल मानबिंदू म्हणजे ‘कोल्हापुरी साज’. हा केवळ सोन्याचा दागिना नसून, करवीरनगरीची समृद्ध कलाकुसर, निसर्गाची शुभ प्रतीके आणि लोकसंस्कृती यांचा मिलाफ आहे. पाना-फुलांच्या नाजूक नक्षींमधून निसर्गाचे वरदान आणि देवदेवतांचे आशीर्वाद गुंफणाऱ्या या दागिन्यात स्थानिक कारागिरांच्या अनेक पिढ्यांचे कौशल्य सामावलेले आहे. शतकानुशतके मराठी स्त्रीच्या सौंदर्याला राजेशाही थाट देणाऱ्या आणि अभिमानाचे प्रतीक व सौभाग्याचे लेणे असणाऱ्या या सुवर्णसाजाला ऐतिहासिक व भावनिक महत्त्वही आहे. साजाची नाजूक हस्तकला आजच्या आधुनिक युगातही तितकीच देखणी आहे.
मराठमोळ्या सौंदर्याची व्याख्या करताना नजरेसमोर येतो तो नऊवारी पैठणीचा जरतारी काठ, कपाळावरची ठसठशीत चंद्रकोर, नाकात मोत्यांची डौलदार नथ आणि गळ्यात दिमाखात रुळणारा कोल्हापुरी साज.
तसे बघायला गेले तर कोल्हापूर म्हटले की पंचगंगेचा शांत प्रवाह आठवतो, रंकाळ्यावर घालवलेली एखादी सायंकाळ आठवते, मर्दानी कुस्तीचे आखाडे, तांबड्या-पांढऱ्या रश्श्याचा ठसका आठवतो आणि करवीरनिवासिनी आई अंबाबाईच्या चरणी टेकलेला माथाही आठवतो. पण याच कोल्हापूरची आणखी एक अमूल्य आणि नाजूक ओळख म्हणजे येथील सुवर्णकारांच्या हातांनी साकारलेली अजरामर सुवर्णकला. दागिन्यांच्या विश्वात सौंदर्याचे लेणे म्हणून ज्या दागिन्याला गौरविले जाते, तो दागिना म्हणजे कोल्हापुरी साज. दागिनेप्रेमींसाठी हा केवळ सोन्यापासून तयार झालेला एखादा दागिना नव्हे, तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहणारा मायेचा आणि संस्कृतीचा सुवर्णझराच आहे जणू!