Premium|Konark Sun Temple : कोणार्क; एका मंदिराच्या जन्मामागील कथा

The Engineering Behind Konark Temple : कोणार्कचे सूर्यमंदिर केवळ अप्रतिम स्थापत्य नाही; त्यामागे कारागीर, हिशोब, ऋतू, कामाची गती आणि छावणी व्यवस्थापनाची विशाल यंत्रणा कशी होती, याचा शोध या लेखमालिकेत घेतला आहे.
Konark Sun Temple

Konark Sun Temple

esakal

Updated on

शंतनू परांजपे

आपल्या मंदिरांविषयीची चर्चा अनेकदा स्थापत्याच्या सौंदर्यावर किंवा आख्यायिकांवर थांबते. त्यात कारागीर, हिशोब, ऋतू, कामाची गती, लेखापरीक्षण आणि छावणी-जीवन या गोष्टी मागे पडतात. कोणार्कच्या संदर्भात मात्र या सर्वांचे लेखी पुरावे आपल्याजवळ आहेत. त्यामुळे या मंदिराकडे पाहताना ते ‘कोणी बांधले?’ या प्रश्नाइतका ‘कोणत्या यंत्रणेने कसे बांधले असेल?’ हा प्रश्नदेखील महत्त्वाचा ठरतो. ही लेखमालिका दुसऱ्या प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवेल.

ओडिशाच्या पूर्व किनाऱ्यावर कोणार्कचे सूर्यमंदिर आज अर्धवट उभे आहे. मूळ गर्भगृहाचे शिखर नाहीसे झाले आहे, समुद्र मागे सरकला आहे आणि ज्या रूपात हे मंदिर तेराव्या शतकात उभे राहिले असेल, त्या रूपाची आज फक्त कल्पनाच करावी लागते. तरीही कोणार्कसमोर उभे राहिल्यावर त्याचा प्रभाव कमी झालेला जाणवत नाही. शंभर फुटांवर अजून उभी असलेली मुखशाळा, तिच्या बाह्य अंगावर असलेली विविध शिल्पे, चोवीस दगडी चाकांनी सजलेला मुख्य मंदिराच्या पीठाचा भाग आणि सूर्याच्या रथाची कल्पना दगडात उतरवण्याची धाडसी दृष्टी हे सर्व पाहताना आपण एका विशाल कलाकृतीसमोर आहोत असे वाटते. पण कोणार्कचा खरा अभ्यास येथे सुरू होत नाही; तो सुरू होतो, अशी रचना तेराव्या शतकातील राज्याने प्रत्यक्षात कशी उभी केली असेल असा प्रश्न उपस्थित झाल्यावर!

भारतातील अनेक मंदिरांकडे पाहताना आपली दृष्टी मुख्यतः देवता, मंदिरांवरील शिल्पे, स्थापत्यशैली आणि दंतकथा यांभोवती फिरते. हे स्वाभाविकच आहे, कारण मंदिराचे दृश्यमान रूप आपल्याला आधी धरून ठेवते. कोणार्कच्या बाबतीतही तेच घडते. चोवीस चाके, चाकांवरून वेळ मोजणे, सूर्याच्या पहिल्या किरणांनी गर्भगृह उजळण्याची कल्पना, ‘ब्लॅक पॅगोडा’ म्हणून युरोपीय खलाशांनी केलेले उल्लेख, चुंबक आणि जहाजांच्या दिशाभ्रमाच्या कथा या साऱ्यांनी कोणार्कभोवती एक मोठे लोककथात्मक वलय तयार केले आहे. पण या वलयातून बाहेर पडून मंदिराच्या उभारणीचा वास्तव इतिहास पाहिला, तर वेगळेच कोणार्क उलगडते. येथे देखणी शिल्पकला आहेच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते एका राजसत्तेच्या योजनाबद्ध कामकाजाची साक्ष देणारे ठिकाण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com