

Konark Temple History
esakal
शंतनू परांजपे
नरसिंहदेवाचा निर्णय केवळ ‘भव्य मंदिर बांधावे’ इतकाच नव्हता. त्याने सूर्यदेवतेच्या पवित्र स्थळावर, रथाच्या स्वरूपातील, आपल्या घराण्याच्या मंदिरपरंपरेला मागे टाकणारे आणि आपल्या विजयांचे स्मरण ठेवणारे स्मारक उभारण्याचा विचार केला. या विचाराला नंतर भूमीशुद्धी, मोजमाप, दगडपुरवठा, कामगार छावण्या, नाणी, नदीमार्ग, मचाणे, धार्मिक विधी आणि प्रतिष्ठापना या सर्व टप्प्यांतून आकार मिळाला.
कोणार्कच्या अभ्यासाचा आरंभ आपण मागील लेखात बया चकादा या दुर्मीळ हस्तलिखितापासून केला. त्या हिशोबवहीमुळे कोणार्कचे मंदिर केवळ शिल्प आणि स्थापत्याच्या पातळीवर न राहता, तेराव्या शतकातील एका विशाल राजकीय उपक्रमासारखे आपल्या समोर येते. परंतु कोणत्याही मोठ्या मंदिराच्या निर्मितीत केवळ दगड, पैसा आणि कारागीर पुरेसे नसतात. त्यामागे संकल्प असतो, त्या संकल्पामागे काळ असतो, आणि त्या काळाला दिशा देणारा राजा असतो. कोणार्कच्या बाबतीत हा राजा म्हणजे पूर्व गंग राजवंशातील नरसिंहदेव पहिला.