Premium|Meghasakha Kuda story : कालिदासाच्या ‘मेघदूत’तील कुडा; रानफुलापासून आयुर्वेदातील अमूल्य औषधापर्यंतचा अद्भुत प्रवास

Holarrhena Pubescens : ग्रीष्माच्या अखेरीस डोंगरउतारांवर बहरणारा कुडा हा केवळ सुंदर रानफूल नसून, कालिदासाच्या मेघदूतापासून आयुर्वेदापर्यंत निसर्ग, साहित्य आणि औषधी परंपरेला जोडणारा अद्वितीय वृक्ष आहे.
Meghasakha Kuda story

Meghasakha Kuda story

esakal

Updated on

डॉ. मंदार दातार

कुडा लाखो पिढ्यांपासून दरवर्षी डोंगर-उतारांवर फुलत आला आहे. त्याची पांढरी, सुगंधी फुले दर ग्रीष्मात उमलतात आणि पावसाळ्यापर्यंत बहरत राहतात. ती पृथ्वीवरच्या सर्वात भव्य नैसर्गिक घटनांपैकी एका घटनेची म्हणजेच मॉन्सूनची साक्षीदार होतात.

आपल्या सखीपासून विरह प्राप्त झालेला एक शापित, कृश झालेला यक्ष रामगिरीवर उभा आहे. आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याला पर्वतशिखरावर एक मेघ दिसतो. चेतना-अचेतनाचे भान पूर्णपणे हरवून बसलेला हा यक्ष त्या उत्तरेला जाणाऱ्या मेघामार्फत हिमालयातील अलका नगरीत वास्तव्यास असणाऱ्या आपल्या भार्येला निरोप पाठवायची कल्पना करतो. ज्याच्या हाती आपला संदेश पाठवायचा आहे, त्या मेघाच्या स्वागतासाठी काय उपहार देता येईल म्हणून यक्ष आसपास बघतो, तर त्याला तिथे दिसतात कुटजाची म्हणजे कुड्याची ताजी सुवासिक फुले. मेघदूताची पार्श्‍वभूमी सांगणाऱ्या महाकवी कालिदासाच्या या श्‍लोकाचा अनुवाद कुसुमाग्रज असा करतात -

गगनपांथ हा नेईल का संदेश वल्लभेप्रत

श्रावणमासी असो सखीचे कुशल असे चिंतीत

कुटजफुलांनी अभिनव त्याला दिधली अर्ध्यांजली

त्या मेघाचे यक्ष पुढे हो करण्याला स्वागत

या एकाच श्‍लोकात कालिदासाच्या कविकल्पनेची जेवढी उंची दिसते, तेवढीच त्याच्या निसर्गाच्या निरीक्षणामागची प्रतिभाही जाणवते. कालिदासाने मेघाचे स्वागत करताना कुडाच का निवडला? तर याचे कारण आहे, कालिदासाचा रामगिरी पर्वत जिथे वसला आहे, त्या मध्य भारताच्या जंगलांत आषाढाच्या तोंडावर हा कुटज नेमका फुललेला असतो.

संस्कृतात ‘कुटज’ नावामागेही एक अर्थ आहे. ‘ज’ म्हणजे जन्मलेला आणि ‘कूट’ म्हणजे डोंगर किंवा टेकडी. मेघदूतातच आम्रकूट नावाचाही एक पर्वत वर्णिलेला आहे. कुडा डोंगर-उतारांवर जन्मलेला आहे. जसा जलज, पंकज तसाच हा कुटज. कुड्याचे शास्त्रीय नाव आहे होलाऱ्हेना प्युबीसीन्स (Holarrhena pubescens). पूर्वी कुडा होलाऱ्हेना अँटिडीसेंटेरिका (Holarrhena antidysenterica) या नावानेही ओळखला जाई. हे जुने नावच कुड्याचा सर्वात महत्त्वाचा गुण सांगते. अँटिडीसेंटेरिका म्हणजे आमांशनाशक. सह्याद्री व मध्य आणि उत्तर भारताच्या पानगळी जंगलांत (आणि आफ्रिकेतही) खडकाळ व उघड्या उतारांवर हा छोटेखानी वृक्ष किंवा झुडूप सहज आढळते. कुड्याच्या बियांना ‘इंद्रजव’ म्हणतात. हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषधद्रव्य आहे. मात्र कुड्याचा खरा खजिना लपला आहे त्याच्या मुळांत आणि खोडाच्या सालीत. याच सालीत कोनेसिनसारखी स्टिरॉइडल अल्कलॉइड्स आढळतात. हीच औषधे त्याच्या अतिसार थांबवण्याच्या आणि जंतूंविरुद्धच्या कामगिरीमागचे खरे रहस्य आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com