श्रद्धा कोळेकर
तुम्ही सकाळी उठल्यावर अंघोळ करण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्लॅस्टिकच्या किती वस्तू वापरता याचं कधी मोजमाप केलंय का..? अंघोळीची बादली प्लॅस्टिकची, मगदेखील प्लॅस्टिकचा, पोळ्यांचा डबा प्लॅस्टिकचा, मग नाश्त्यासाठी ज्या प्लेट वापरता त्याही बहुधा प्लॅस्टिकच्या, पाण्याच्या बाटल्या, मुलांचे डबे, उरलेलं अन्न काढून ठेवण्यासाठीचे डबे, मसाल्याचे डबे, अन्न पॅक करण्यासाठीही प्लॅस्टिक; स्वच्छतेचं सगळं साहित्य, मेकअपचं सामान, एवढंच काय तुमची लहान मुलं वापरत असलेली खेळणीसुद्धा प्लॅस्टिकची!
तुम्ही रोजच्या आयुष्यात जे प्लॅस्टिक वापरता, तेच तुमच्या हृदयासाठी अत्यंत घातक असल्याचं नुकत्याच झालेल्या संशोधनातून समोर आलं आहे. जागतिक पातळीवर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या लॅन्सेटच्या २०२५च्या अहवालामधून ही माहिती समोर आली आहे. प्लॅस्टिक अत्यंत घातक आहे, हे सांगणारे अनेक अहवाल याआधीदेखील समोर आले आहेत. तरीही आपण आपल्या दैनंदिन व्यवहारातील त्याचा वापर कमी करण्यामध्ये कमी पडत आहोत. पण आता हा लॅन्सेटचा अहवाल केवळ सद्यपरिस्थिती सांगत नाही, तर भविष्यातदेखील प्लॅस्टिकचा वापर वाढल्याने किती लोकांवर याचा परिणाम होणार आहे, हेसुद्धा सांगतो आहे. त्यामुळे पुढच्या पिढ्यांचं भवितव्य आपल्याच हातात आहे, आणि ते जपण्याची जबाबदारीदेखील आपलीच आहे, हे लक्षात घ्यायला हवं.
‘प्लॅस्टिक घातक आहे, ते वापरू नये,’ असं केवळ सांगितल्यानं ती गोष्ट तितकीच गांभीर्यानं घेतली जातेच असं नाही. या प्लॅस्टिकमध्ये नेमके कोणते घटक असतात? ते शरीरात कसे जातात? त्यामुळे शरीरात काय बदल होतात? आणि हे सगळं टाळायचं असेल तर काय करावं लागणार आहे? हे सगळं सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करू या.