सीए प्रवीण बांगर
रेरामधील काही तरतुदींमुळे सोसायटी सभासद-ग्राहक यांच्या हिताचे रक्षण होईल व त्यांना न्याय मिळेल; कायदेशीर तरतुदींचा आधार घेत लढा देता येईल. अशा काही तरतुदींविषयी...
दोन दशकांपूर्वी बांधल्या गेलेल्या बऱ्याचशा इमारती आज राहण्यायोग्य, वापरायोग्य स्थितीत नसलेल्या जाणवतात. अशा मोडकळीस आलेल्या इमारती मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या शहरी भागांमध्ये अधिक दिसतात. जुन्या इमारतींच्या धोकादायक स्थितीमुळे अशा इमारतींचा पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट) करणे अत्यंत आवश्यक बाब झालेली आहे. बहुतांशजण या पर्यायाचा प्राधान्याने विचार करताना दिसत आहेत.
पुनर्विकास म्हणजे एखादी धोकादायक स्थितीतील जुनी इमारत पाडून त्याजागी नवीन, अधिक सुरक्षित, अत्याधुनिक, सुविधायुक्त इमारत उभारणे. बांधकाम विकसक पुनर्विकसित इमारतींमध्ये मूळ रहिवाशांना आधीच्या घराच्या क्षेत्रफळापेक्षा सामान्यतः थोड्या अधिक क्षेत्रफळासह घरे देतो आणि उर्वरित सदनिका व व्यावसायिक जागा विक्रीसाठी काढतो.