Premium|Lhasa Kathmandu Cycling : ल्हासा ते काठमांडू हजार किलोमीटरची सायकल मोहीम; हिमालयातील अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव

Lhasa to Kathmandu Cycling Expedition : तिबेट-नेपाळमधील ऐतिहासिक व्यापारी मार्गावरून २०१९मध्ये केलेल्या सायकल मोहिमेचा अनुभव, हिमालयातील निसर्गसौंदर्य आणि पुरामुळे बदललेली त्या मार्गाची आठवण.
Lhasa to Kathmandu Cycling Expedition

Lhasa to Kathmandu Cycling Expedition

esakal

Updated on: 

शुभमय घोष

तिबेट, नेपाळ आणि भारत यांच्यातील एक व्यापारी मार्ग म्हणून नेपाळ-तिबेट सीमेवरील रस्त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. हिमालयाच्या दोन्ही बाजूंच्या संस्कृतींमध्ये संवाद आणि देवाणघेवाणीसाठी हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक मार्ग होता. शतकानुशतके धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती, खानपानाच्या सवयी आणि विविध प्रकारच्या वस्तू या मार्गावरून एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात पोहोचल्या आहेत.

‘नेपाळ-तिबेट सीमेवरील त्रिशुली नदीला आलेल्या भीषण पुरात पाच हजार लोक बेपत्ता. नेपाळमधील चिनी सीमा तपासणी नाके आणि अनेक गावे उद्ध्वस्त.’ २६ ऑगस्ट २०२६च्या या दुःखद बातमीने मला माझ्या एका अनुभवाची आठवण करून दिली. २०१९मध्ये मी याच ऐतिहासिक मार्गावरून सायकल चालवली होती. विशाल हिमालय पर्वतरांगांमधून जाणारी ल्हासा ते काठमांडू (सुमारे एक हजार किलोमीटर अंतराची) अशी ती एक सायकल मोहीम होती. उंच हिमालयाच्या कुशीत वसलेला हा मार्ग त्यावेळी मला एखाद्या स्वर्गीय जगासारखा वाटत होता!

ता. २६ मार्च २०१९च्या रात्री मी माझ्या स्लीपिंग बॅगमध्ये थकून आडवा झालो होतो. तंबूच्या बाहेर जोरदार वारा वाहत होता आणि सर्वत्र दाट अंधार पसरला होता. पंधरा दिवस सायकल चालवल्यानंतर माझी जवळजवळ सगळीच शक्ती संपली होती. तरीही हा प्रवास माझ्या आयुष्यातील एक अभूतपूर्व अनुभव होता. तिबेटमधील साधी माणसे, सुंदर निसर्ग, ऐतिहासिक मठ आणि किल्ले, स्वर्गीय सरोवरे आणि बर्फाच्छादित हिमालय यांनी माझ्या स्मृतीवर खोलवर ठसा उमटवला. आतापर्यंत मी एव्हरेस्ट, चो ओयू आणि शिशापांगमा यांसारख्या उंच हिमशिखरांजवळून सायकल चालवली होती. दुसऱ्या दिवशी हिमालय ओलांडून त्याच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचण्याची योजना होती. आमचा कॅम्प हिमालयाच्या उत्तर बाजूला, तिबेटी पठारावर, कोंग तांग लामू या पर्वतीय खिंडीच्या खाली होता. दुसऱ्या दिवसाचे ध्येय अत्यंत कठीण होते. हिमालय ओलांडून १०० किलोमीटर दूर असलेल्या नेपाळच्या सीमेवर पोहोचायचे होते. या सगळ्याचा विचार करत कधी झोप लागली माझे मलाच कळले नाही.

दुसऱ्या दिवशी २७ मार्चला सकाळी साडेसात वाजता हाडे गोठवणाऱ्या थंडीत सायकलवरून निघालो. एक तास सायकल चालवल्यानंतर सुमारे ५,९२७ मीटर उंचीच्या कोंग तांग लामू खिंडीत पोहोचलो. भौगोलिकदृष्ट्या या खिंडीच्या एका बाजूला तिबेटचे पठार आणि दुसऱ्या बाजूला भारतीय उपखंड आहे. मॉन्सूनचे ढग हिमालय ओलांडू शकत नसल्यामुळे तिबेटच्या पठाराचे कोरड्या आणि थंड वाळवंटात रूपांतर झाले आहे आणि दक्षिणेला मॉन्सूनच्या पावसामुळे निसर्ग हिरवागार झालेला आहे, मधोमध पांढरीशुभ्र बर्फाच्छादित शिखरे रांगेत उभी आहेत... मोठे नयनरम्य दृश्यच ते!

खिंडीच्या माथ्यावरून एक काळा कच्चा रस्ता ग्यिरोंग दरीच्या दिशेने खाली उतरत होता. रस्त्याचे बांधकाम अजूनही सुरू होते. माझे ध्येय एका दिवसात १०० किलोमीटर अंतर कापून, जवळजवळ तीन हजार मीटर खाली वसलेल्या ग्यिरोंग शहरात पोहोचण्याचे होते. २०१५च्या भूकंपामुळे तिबेट-नेपाळ मैत्री महामार्ग नेपाळ सीमेवर बंद करण्यात आला होता. नंतर चीन सरकारने कोंग तांग लामू खिंड ओलांडून ग्यिरोंग दरीमधून हा नवीन रस्ता बांधला. वळणदार वाटेने खिंडीतून खाली उतरल्यानंतर माझ्या लक्षात आले, की खिंडीखाली एक बोगदाही बांधला जात होता. तो वर्षभर वाहतुकीसाठी खुला राहणार होता. मग हिरव्यागार गवताने आच्छादलेल्या दरीतून मी पुढे निघालो. सर्वत्र लहान फुले उमललेली होती. तापमान अत्यंत थंड होते. एवढ्या उंचीवर मोठी झाडे नव्हती, पण आजूबाजूच्या बर्फाच्छादित पर्वतांमुळे ते दृश्य विलक्षण दिसत होते. ग्यिरोंग दरी राजकीयदृष्ट्या तिबेटचा भाग असली, तरी तिचे स्वरूप तिबेटच्या कोरड्या आणि थंड वाळवंटापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. ती नेपाळमधील इतर हिरव्यागार दऱ्यांसारखीच आहे. ग्यिरोंग किंवा केयारोंग या शब्दाचा अर्थ ‘सुंदर दरी’ असा होतो.

Loading content, please wait...