

Life Cycle Hypothesis
esakal
डॉ. अमेय खरे
आर्थिक नियोजन म्हणजे जास्त पैसे कमावणं नव्हे, तर योग्य वयात योग्य आर्थिक निर्णय घेणं. कारण पैसा म्हणजे केवळ बँक खात्यातला आकडा नसतो. तो आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळी भूमिका बजावत असतो. आपण त्या भूमिका जितक्या चांगल्या समजून घेऊ शकू, तितकं आपलं आयुष्य आर्थिकदृष्ट्या अधिक स्थिर, सुरक्षित आणि समाधानी होऊ शकतं.
ए का व्यक्तीच्या आयुष्यातल्या तीन वेगवेगळ्या टप्प्यांकडे काळजीपूर्वक बघू या. पहिल्या टप्प्यात त्या व्यक्तीला पहिल्या नोकरीचा पहिला पगार मिळतो. तो आनंदात मित्रांना पार्टी देतो, नवीन मोबाईल घेण्याचा विचार करतो आणि पुढच्या सहलीचं नियोजन करतो. दुसऱ्या टप्प्यात तोच माणूस चाळिशीत असतो. महिन्याच्या सुरुवातीलाच घराचा ईएमआय, मुलांच्या शाळेची फी, विम्याचा हप्ता आणि घरखर्च यांची यादी त्याच्यासमोर असते. तिसऱ्या टप्प्यात तो साठीनंतरच्या आयुष्यात प्रवेश करतो. आता त्याच्यासमोर हा प्रश्न नसतो, की किती कमवायचंय; तर आत्तापर्यंत केलेली बचत आणि गुंतवणूक पुढची वीस ते पंचवीस वर्षं पुरेल का? या तिन्ही व्यक्ती वेगळ्या नाहीत, ती एकच व्यक्ती आहे. बदलतात ते फक्त त्या व्यक्तीच्या आयुष्याचे टप्पे. म्हणूनच आर्थिक निर्णयही बदलतात.
आपण अनेकदा असा समज करून घेतो, की आर्थिक नियोजन म्हणजे काही ठरावीक नियम. प्रत्येकाने बचत करावी, गुंतवणूक करावी, विमा घ्यावा, कर्ज टाळावे हे सगळे सल्ले योग्य असले, तरी ते प्रत्येक वयात सारखेच लागू होत नाहीत. अर्थशास्त्र आपल्याला सांगते की योग्य आर्थिक निर्णय हा केवळ उत्पन्नावर अवलंबून नसतो. तो आपण आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर आहोत, यावरही तितकाच अवलंबून असतो. याच विचारातून अर्थशास्त्रात एक महत्त्वाचा सिद्धांत विकसित झाला, ज्याला लाइफ सायकल हायपोथेसिस म्हणजेच जीवनचक्र गृहीतक असे म्हणतात.