सुनीता नारायण
आपण निर्माण केलेल्या कचऱ्यासाठी आपण स्वत: जबाबदार आहोत हे आता आपण लक्षात घ्यायला हवे. कारण आपण प्लॅस्टिकशिवाय जगू शकतो आणि आपल्याला प्लॅस्टिकशिवाय जगावेच लागेल!
हिंदू धर्मामध्ये, सृष्टीचा निर्माता असलेल्या ब्रह्मदेवाला विनाशाचा देव असलेल्या शिवाच्या तुलनेत काहीसे कमी महत्त्व आहे. त्यामागे काही कारणेही आहेत. एकेकाळी चमत्कार किंवा आश्चर्यकारक मानल्या गेलेल्या, दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तूंची भीषणता गेल्या पन्नासेक वर्षांमध्ये जगाला कळली आहे.
डीडीटीचेच (Dichloro-Diphenyl-Trichloroethane) उदाहरण घ्या; डीडीटीसारखे विषारी कीटकनाशक वापरानंतर खूप वेळ पर्यावरणामध्ये राहत होते. कालांतराने पक्ष्यांच्या अंड्यांमध्ये आणि माणसांच्या रक्तामध्येसुद्धा डीडीटीचे संचयन झाल्याचे आढळले. अशाच वातावरणामध्ये दीर्घकालीन टिकणाऱ्या क्लोरोफ्लुरोकार्बन्स(सीएफसी) या अविनाशी रसायनांमुळे तर ओझोनच्या थराला भोक पडले. याहून भीषण आहे तो जीवाश्म इंधनांच्या ज्वलनामधून उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड १५० ते २०० वर्षे वातावरणामध्ये राहतो! कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामुळे हवामान बदलामुळे होणाऱ्या घटनांची तीव्रता सातत्याने वाढत अाहे. आपत्तींचे प्रमाण वाढत आहे.