डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी
आज जाहीरपणे आम्ही आमच्या आयुष्याच्या एका गोंधळाचा खुलासा करत आहोत. हा गोंधळ आहे हृदय आणि मनाबाबतचा!
आम्ही शुद्ध मराठी असून या कणखर महाराष्ट्रातील राकट मन राखून असणारे एक नागरिक आहोत.
काल परवाच आम्ही वाचले, की हृदय हे प्रेमाचे प्रतीक आहे. हे वाचल्यानंतर आमचा जो गोंधळ उडाला त्यात आम्हाला आठवले, की आम्ही तर शरीरात नसणाऱ्या मन नामक कल्पनेद्वारेच आमच्या सर्व भावना आजवर व्यक्त केल्या होत्या. ‘मनावर घेऊ नको’, ‘मनाप्रमाणे वागू नको’, ‘माझ्या मना बन दगड’, ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ अशा परस्परविरोधी भावना जपत आम्ही आजवर आमचा सुखाचा संसार करत आलेलो आहोत.
नजरानजर, दृष्टिक्षेप, इशारे, होकार, स्वीकार आणि स्पर्श यातून आम्ही प्रेम नावाचे जे काही प्रकरण असते ते आटोपलेले आहे. हे आटोपताना हृदय कुठेही आडवे आले नव्हते.
पण, हे असे सारे करत असताना आम्हाला आमच्या तारुण्यकाळी आजूबाजूला अष्टौप्रहर हिंदी गाण्यांचा भडिमार सोसावा लागला होता.