डॉ. श्रीकांत कार्लेकर
मादागास्कर आणि आग्नेय आफ्रिकेच्या किनाऱ्यावर मृदू प्रवाळ विविधतेसाठी ओळखले गेलेले नवीन ऊर्जा स्थान समृद्धतेमध्ये कोरल त्रिकोणाला टक्कर देऊ शकते. समुद्राची वाढलेली उष्णता, अतिमासेमारी आणि प्रदूषण यांसारख्या धोक्यांना बळी पडणाऱ्या स्थानिक मृदू प्रवाळ प्रजातींच्या मोठ्या संख्येसाठी हा प्रदेश उल्लेखनीय आहे.
‘समुद्रातील प्रवाळ आणि प्रवाळ खडक किंवा प्रवाळ मंच (Coral Reefs) आणि त्यांचे जागतिक वितरण आपल्याला अजूनही नेमके कळलेले नाही. आमच्या संशोधनातून प्रवाळांच्या वितरणाचे काही आश्चर्यकारक खुलासे समोर आले आहेत,’ असे मत जीवशास्त्रज्ञ प्राध्यापक कॅथरीन मॅकफॅडेन यांनी अलीकडेच व्यक्त केले. त्या कॅलिफोर्नियातील हार्वे मड कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. प्रवाळांच्या विविधतेबद्दल आणि वितरणाबद्दल अनेक दशके संशोधन केल्यानंतर तयार झालेले मत त्यांनी मांडले आहे.
प्रवाळ व प्रवाळ खडक प्रदेश, सदाहरित जंगले आणि पाणथळ प्रदेश ही पृथ्वीवरची ऊर्जा केंद्रे समजली जातात. सध्याच्या हवामान बदलाचा आणि जागतिक तापमानवाढीचा पहिला बळी प्रवाळ प्रदेश असतील, असे संकेत गेल्या दोन दशकांपासून मिळू लागलेच आहेत. याच कारणामुळे जगातील प्रवाळ प्रदेशांचे रक्षण आणि संवर्धन हे प्राधान्याने करण्याचे काम आहे. त्यासाठी त्यांच्या वितरणाचे आकृतिबंध नेमकेपणाने कळणे आवश्यक ठरत आहे. कॅथरीन मॅकफॅडेन यांच्या या अभ्यासाला त्यामुळेच अनन्यसाधारण महत्त्व आहे.