

Indian Heritage Monuments and Wildlife
esakal
जवळचे शहर : चेन्नई
जवळचे विमानतळ : चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ
जवळचे रेल्वेस्थानक : चेंगलपट्टू जंक्शन
केव्हा जाल? : नोव्हेंबर ते जानेवारी
वारसास्थळाची वैशिष्ट्ये : चेन्नई शहरापासून ५७ किलोमीटर अंतरावर वसलेले आणि थोर पल्लव साम्राज्याच्या समृद्धीची साक्ष देणारे व्यापारी बंदर शहर म्हणजे महाबलीपुरम. पल्लव राजा पहिला नरसिंहवर्मन याच्या ‘महामल्ल’ वा ‘मामल्ल’ या बिरूदावरून या ठिकाणास ‘मामल्लपुरम’ हे नाव पडले असावे, याचेच पुढे महाबलीपुरम असे रूपांतर झाले. इ.स. सहाव्या ते नवव्या शतकात पल्लवांनी घडविलेल्या मंदिरवास्तू शिल्पांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. द्रविड वास्तुकलेचे अत्यंत प्राचीन असे हे उदाहरण ठरले आहे. ‘रथ’ नावाने प्रसिद्ध असणारी एकाश्म स्वरूपातील मंदिरे, ‘अलैवाय-क-कोवील’ (तट-मंदिर) हे सागरकिनाऱ्यावरील शिवमंदिर आणि गंगावतरणाची कथा साकार करणारा, सुमारे ९६ फूट लांब व ४३ फूट इतका विस्तीर्ण शिल्पपट्ट हे इथली उल्लेखनीय ठिकाणे होत. या गंगावतरण शिल्पाची निर्मिती एकसंध शिलाखंडातून झाली. या शिलाखंडावर आधी पाण्याचे कुंड होते. तेथून शिलाखंडातील फटींचा चतुराईने वापर करून शिल्पकारांनी बांधलेल्या घळीतून पाणी वाहत असे; त्याला प्रतिकात्मक गंगा समजले जाई. महाभारतातील पाच पांडव आणि द्रौपदी यांना समर्पित अशी रथशिल्पही येथे पाहावयास मिळतात. राजा पहिला नरसिंहवर्मन याच्या काळात ‘गुहा-मंदिरे’ या वास्तूप्रकारात नवीन बांधकामशैली विकसित झाली. यातूनच पुढे महिषासुरमर्दिनी गुहा आणि वराहमंडप या वास्तूंची निर्मिती झाली. या स्मारकसमूहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे कोरलेली प्राण्यांची मोहक शिल्पे. उंदीर, मांजर, नाग, सिंह अशा अनेक प्राण्यांची ही शिल्पे अगदी जिवंत भासतात.