

Gatha Saptashati Maharashtri Prakrit
esakal
कला आणि साहित्य- डॉ. नागनाथ बळते
सातवाहन काळात निर्माण झालेली लोकाभिमुख भाषा, भावप्रधान साहित्य आणि समाजजीवनाशी निगडित अभिव्यक्ती ही अभिजात भाषेची लक्षणे मराठीत स्पष्टपणे दिसतात. अशा प्रकारे सातवाहन काळातील महाराष्ट्री प्राकृत ही मराठी भाषेची जननी मानता येईल. सातवाहनांच्या भाषाश्रयामुळे मराठी भाषेला दीर्घ साहित्यिक परंपरा लाभली.
महाराष्ट्रातील सातवाहनकालीन हीनयान लेणी बौद्ध पंथाच्या असल्यामुळे त्यात कोठेही भगवान बुद्धाची मूर्ती आढळत नाही. पादुका, भद्रासन, स्तूप, बोधिवृक्ष इत्यादिकांनी त्याचे अस्तित्व सूचित केलेले आहे. त्यामुळे तत्कालीन शिल्पे फारशी दिसत नाहीत. त्याकाळी यक्षसंप्रदाय प्रचलित होता. म्हणून यक्ष-यक्षिणीच्या मूर्ती स्तूपांच्या कठड्यांवर कोरल्या जात. अशा अनेक मूर्ती भारहूत येथील शुंगकालीन स्तूपाशी संलग्न असलेल्या सापडल्या आहेत. त्यांची नावेही त्यांच्या मूर्तीजवळ कोरली आहेत. पौनी येथील स्तूपाजवळ तशा मूर्ती फारशा सापडल्या नाहीत. एका यक्षमूर्तीचा खालचा अर्धभाग मिळाला आहे; त्यावरून तिचे कोरीवकाम उत्कृष्ट प्रकारचे असावे असे वाटते. खरमुख यक्षाचीही एक मूर्ती मिळाली आहे. तो संमुख उभा असून त्याचा उजवा पाय गुडघ्याजवळ वाकला आहे. त्याने डाव्या हाताचा पंजा छातीवर ठेवला आहे. उजवा हात अभय मुद्रेत वर केला आहे. त्याने नेसलेले धोतर तलम प्रकारचे असून त्यावर मेखला घातली आहे. त्याचे यज्ञोपवीत व कंकणादि इतर अलंकारही स्पष्ट दिसतात.