परमेश्वराची भेट कुठे होईल विचारणारे हे दांपत्य!

राजस्थानात पंधराव्या शतकात पीपाजींनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेला आणि जातिवादाला आव्हान दिले. त्यामुळे त्यांना ‘राजपुतान्याचे लोकसंत’ असेदेखील संबोधले जाते.
संत पीपाजी आणि त्यांची पत्नी सीता.
संत पीपाजी आणि त्यांची पत्नी सीता.esakal

राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यातील समदडी येथे पीपाजींचे विशाल मंदिरही आहे. समदडी, गागरोन (झालवाड) आणि मसुरिया (जोधपूर) आदी ठिकाणी दरवर्षी पीपाजींचा यात्रोत्सव आयोजित केला जातो.

टोडा येथील त्यांची गुहा पीपाजी की गुंफा म्हणून ओळखली जाते. राजस्थानातील विणकर अथवा शिंपी समाज पीपाजींना आपले आराध्य दैवत मानतो.

डॉ. राहुल हांडे

राजस्थानात पंधराव्या शतकात पीपाजींनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेला आणि जातिवादाला आव्हान दिले. त्यामुळे त्यांना ‘राजपुतान्याचे लोकसंत’ असेदेखील संबोधले जाते.

इ.स.१३९०च्या दरम्यानचा काळ असावा. राजस्थानातील गागरोन गढ़ येथून एक दांपत्य द्वारकेला पोहोचले. परमेश्वराचा शोध घेण्यासाठी ह्या दांपत्याने गृहत्याग केलेला होता. द्वारकेला आपल्या शोधयात्रेचा अंत निश्चितपणे होईल, अशी आशा ह्या दांपत्याला होती.

द्वारका नगरीत पोहोचल्यावर द्वारकाधिशाच्या मंदिरातील पंडे आपल्याला अचूक मार्गदर्शन करतील असा विश्वासही ह्या दांपत्याला होता. हे दांपत्य मंदिरातील पंड्यांकडे पोहोचले आणि परमेश्वर कुठे भेटेल, असा प्रश्न त्यांनी पंड्यांना केला.

पंड्यांनी त्या दांपत्याला, द्वारकाधिशाचे दर्शन तुम्हाला समुद्रात होऊ शकते असे सांगितले. पंड्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्या दांपत्यानं समुद्रात उडी घेतली आणि खरोखरच समुद्रात त्यांना द्वारकाधिशाचे दर्शन झाले.

नऊ दिवस द्वारकाधिशाचा पाहुणचार घेऊन ते दांपत्य पृथ्वीवर परतले तेव्हा निरोप देताना द्वारकाधिशाने त्यातील पतीला भेट म्हणून ब्रह्मज्ञान दिले होते.

ही कथा मोठी रंजक वाटते; परंतु या कथेवरील अवास्तवाचे आवरण दूर केल्यावर दिसणारा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे, हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही.

संत पीपाजी आणि त्यांची पत्नी सीता.
Sant Dnyaneshwar :भक्तीचे मूर्तिमंत उदाहरण संत ज्ञानेश्वर!

परमेश्वराची भेट कुठे होईल हे विचारणारे कथेतील दांपत्य पंड्यांना जसे भोळसट वाटले तसे कोणालाही वाटू शकते. या कथेतून जुन्या काळातल्या आपल्या पौराणिक चित्रपटातील भोळ्या-भाबड्या भक्तांची प्रतिमा डोळयांसमोर उभी राहिल्याशिवाय राहत नाही.

(काही सन्मान्य अपवाद वगळले तर भक्ती आंदोलनातील संतांवरील चित्रपटांनी संत चरित्रातील, संत कर्तृत्वातील व तत्त्वज्ञानातील प्रबोधन ह्या मूळ गाभ्याला मारण्याचेच काम प्रामुख्याने केलेले दिसते, असो.)

उपरोक्त कथेतील हे दांपत्य कोण होते? या प्रश्नाचे उत्तर जेव्हा सापडते तेव्हा कथेचा खरा अर्थ आपल्या हाताशी येऊ शकतो.

परमेश्वर भेटीसाठी समुद्रात उडी घेणारे दांपत्य म्हणजे राजस्थानचे लोकसंत म्हणून ज्यांना ओळखले जाते ते संत पीपाजी आणि त्यांची पत्नी सीता.

भगवान बुद्ध, भगवान महावीर, राजर्षी भर्तृहरी यांच्याप्रमाणे राजसिंहासनाचा त्याग केलेला, वीरयोद्धा व प्रजादक्ष राजा म्हणून ख्याती असलेल्या पीपाजींच्या संतत्वाचा प्रवास एखाद्या अद्‍भुत व रोमांचपूर्ण कादंबरीप्रमाणे वाटावा असावा आहे.

राजस्थानातील झालवाड प्रांतातील गोगरोन राज्याच्या चौहानवंशीय खींची शाखेतील महाराजा कडवाराव आणि महाराणी लछमावती यांना एक पुत्र झाला.

त्याचे नाव प्रतापराव असे ठेवण्यात आले. प्रतापरावाच्या जन्माबद्दलही अभ्यासकांमध्ये मतमतांतरे दिसतात. डॉ. जॉन निकोल फर्कुहर प्रतापरावांचे जन्मसाल इ.स. १४२५ असे निश्चित करतात. सर अॅलेक्झांडर कनिंगहम यांनी गागरोन राजघराण्याच्या वंशावळीवरून प्रतापराव यांचा जन्म इ.स. १३६० ते १३८५ यादरम्यान निश्चित करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

प्रतापराव यांच्या एका प्रवासवर्णनावरून या मताला पुष्टी मिळते. मात्र प्रतापराव अर्थात पीपाजी यांच्या दोन काव्यरचनांचा आधार घेतल्यास ते कबीरसाहेबांचे प्रशंसक आणि त्यांना गुरुतुल्य अथवा मार्गदर्शक मानत होते, असे लक्षात येते.

पीपाजी कबीरसाहेबांचे समकालीन असावेत आणि कबीरसाहेबांनंतरही बराच काळ हयात होते, असा अंदाज आचार्य परशुराम चतुर्वेदी व्यक्त करतात. यासाठी चतुर्वेदी आणखी एक दाखला देतात. त्यानुसार पीपाजींचे ज्येष्ठ बंधू राजा अचलदास यांचा विवाह राणा कुंभा यांची बहीण लाला हिच्यासोबत झाला होता आणि ती त्यांची पहिली राणी होती.

राणा कुंभांचा काळ इ.स. १४१८ ते १४६८ असा आहे. त्यामुळे डॉ. फर्कुहर यांच्या प्रतापरावांचा जन्म इ.स. १४२५ साली झाला ह्या तर्काला आचार्य चतुर्वेदी सत्याच्या अधिक जवळ मानतात व प्रतापरावांचा जन्मकाळ इ.स. १४०८ ते १४१८च्या दरम्यान असावा असा तर्क मांडतात.

या सर्व संशोधनाचा आधार घेत इ.स. १४१० ते १४१५च्या दरम्यान प्रतापरावांचा जन्म झाला असावा, असे म्हणता येते. उपलब्ध माहितीनुसार प्रतापराव यांनी गागरोनचे महाराज म्हणून सुमारे बारा वर्षे राज्यकारभार सांभाळला.

एक वीरयोद्धा आणि कुशल सेनानायक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी आपल्या कार्यकाळात फिरोजशाह तुघलक, मलिक जर्दफिरोज व लल्लन पठाण यांना पराभूत करून आपल्या सामर्थ्याची व वीरत्वाची प्रचिती दिली होती.

संत पीपाजी आणि त्यांची पत्नी सीता.
Sant Gadage Baba: दीनदुबळ्यांमध्ये देव शोधणाऱ्या संत गाडगेबाबांचे जुने फोटो

बारा वर्षे समर्थपणे राज्यकारभार पाहणाऱ्या आणि आपल्या बारा राण्यांसमवेत सुखी-संपन्न जीवन जगणाऱ्या महाराज प्रतापराव यांना विरक्ती आली, ते परमेश्वराच्या शोधयात्रेवर निघाले तेव्हा त्यांची सर्वात धाकटी राणी सोलंखणी हिने आपल्या पतीची सहपाथंस्थ होण्याचा निर्णय घेतला.

द्वारकेच्या अनुभवातून त्यांनी भक्तीविषयक सर्मपणाचा आणि परमेश्वर केवळ मंदिरात अथवा ज्याला तीर्थस्थान म्हटले जाते तेथेच नसतो तर चराचरांत सामावलेला असतो, असा दृष्टांत घेतला आणि कदाचित तेथील पंड्यांनादेखील देण्याचा प्रयत्न केला.

परमेश्वराच्या शोधासंदर्भात आपल्याला योग्य मार्गदर्शन काशी येथे स्वामी रामानंद यांच्याकडून होऊ शकते, अशी माहिती मिळाल्यानंतर पीपाजी द्वारकेवरून पत्नी सोलंखणीसह काशीला पोहोचले. काशीला स्वामी रामानंद यांच्याकडून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली.

त्यांच्यासमवेत सोलंखणीनेदेखील रामानंदांकडे संन्यासाची अनुमती मागितली. यासाठी तिला कठोर परीक्षा द्यावी लागली. त्यामध्ये सफल झाल्यानंतर स्वामी रामानंद यांनी तिला संन्यास दीक्षा देत तिचे नामकरण ‘सीता’ असे केले.

रामनंद ज्या सीतापंथाचे अनुयायी होते, म्हणजे सीतेने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचे अनुयायी होते. त्या सीतेचे नाव त्यांनी सोलंखणीला दिले.

यातून स्त्रीचा संन्यासाचा, भक्तीचा व ज्ञानाचा अधिकार मान्य करणाऱ्या व देण्याऱ्या वैष्णव तत्त्वज्ञानाची प्रचिती येते. राजवाड्यातील सुखांचा त्याग करत हे पती-पत्नी संन्यास घेऊन भक्तीच्या कठीण मार्गाचे पथिक झाले.

स्वामी रामानंद आपल्या शिष्याची परीक्षा घेण्यासाठी गागरोनला गेले असता पीपीजींनी राज्यकारभार आपला पुतण्या कल्याणराव याच्याकडे सोपवला आणि भक्तिमार्गावर चालण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राज्य आणि प्रपंच यांचा त्याग केला.

जीवनाच्या प्रारंभी देवी अथवा दुर्गेचे उपासक म्हणजेच शाक्त असलेल्या पीपाजींनी वैष्णव भक्तीचा मार्ग अवलंबला. यानंतर भगत धन्ना यांनी राजस्थानात प्रारंभ केलेल्या भक्तियुक्त प्रबोधनाचा विकास पीपाजींच्या माध्यमातून झाला.

संत पीपाजी आणि त्यांची पत्नी सीता.
Sant Namdev Punyatithi : नामदेव महाराजांचा थोडक्यात जिवन प्रवास...

मध्ययुगीन भारतात तेराव्या शतकात चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि जातिवाद याला सर्वप्रथम महाराष्ट्रात आव्हान देण्यात आले. राजस्थानात पंधराव्या शतकात पीपाजींनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेला आणि जातिवादाला आव्हान दिले.

त्यामुळे त्यांना ‘राजपुतान्याचे लोकसंत’ असेदेखील संबोधले जाते. पीपाजींनी स्त्रियांच्या गोषा पद्धतीलादेखील विरोध केला होता. त्यांनी कायम स्त्रियांना ज्ञानाचा व भक्तीचा अधिकार समानपणे देण्याचा आग्रह केला.

यासाठी त्यांच्या जीवनातील एक कथा मोठी उद्‍बोधक आहे. एक दिवस पीपाजींनी परमेश्वराला दह्याचा नैवेद्य दाखवण्यासाठी एका गवळणीकडून दही घेतले. तिला देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळेस पीपाजी गवळणीला म्हणाले, रामाला जी काही भेट येईल ती तुला देतो.

त्याचवेळी एक धनिक मंदिरात आला व रामचरणी बऱ्याच सुवर्णमुद्रा अर्पण करून निघून गेला. पीपाजींनी गवळणीला त्या सुवर्णमुद्रा घेण्यास सांगितले. गवळणीने मात्र त्यातील काहीच सुवर्णमुद्रा घेतल्या आणि उरलेल्या तिथेच ठेवल्या. पीपाजींनी गवळणीमधील निष्ठा व भक्ती ओळखली आणि तिला दीक्षित केले.

राज्यकारभार आणि प्रपंच यांचा त्याग केल्यानंतर पीपाजी आणि त्यांची पत्नी सीता राजस्थानातील टोडा नगरात वास्तव्य करू लागले. आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत पीपाजी टोडामध्येच होते. कधीकाळी सगुण भक्तीत हरवलेले पीपाजी निर्गुण भक्तीचे पथिक झाले. त्यांनी इतरांना निर्गुण भक्तीचा मार्ग दाखवला.

अचानक उठला आणि पाप मुक्तीसाठी वाराणसीला पोहचला, तेथे जाऊन हजारदा गंगेत न्हाला याचा अर्थ असे करणाऱ्याला भक्ती आणि परमात्मा समजला असे नव्हे.

त्याच्यापेक्षा ज्याने केवळ एक वेळा संपूर्ण समर्पण व सात्विकतेने रामनाम जपले असा माणूस परमात्म्यापर्यंत पोहोचला. भक्तीची अशी सहज-सुलभ व्याख्या करताना पीपाजी म्हणतात -

संत पीपाजी आणि त्यांची पत्नी सीता.
Sant Janabai: स्त्री संत आपली परमेश्वरभक्ती कशा व्यक्त करीत असतील?

उठ भाग्यो वाराणसी, न्हायो गंग हजार।

पीपा वे जन उत्तम घणा, जिण राम कयो इकबार।।

पीपाजींच्या संदर्भातील अनेक दंतकथा वा आख्यायिका राजपुतान्याच्या समाजजीवनात प्रचलित असलेल्या दिसतात. पीपाजी द्वारकेच्या यात्रेला गेले असता बावडी नावाच्या एका गावात एका ब्राह्मणाच्या मुलाला सर्पदंश झाला. मुलाच्या माता-पित्याच्या याचनेवरून पीपाजींनी परमेश्वराची प्रार्थना करून मुलाला जीवदान दिले.

हा प्रसंग जिथे घडल्याचे सांगितले जाते ते स्थान आजही काल बावडी म्हणून प्रसिद्ध आहे. राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यातील समदडी येथे पीपाजींचे विशाल मंदिरही आहे. समदडी, गागरोन (झालवाड) आणि मसुरिया (जोधपूर) आदी ठिकाणी दरवर्षी पीपाजींचा यात्रोत्सव आयोजित केला जातो.

टोडा येथील त्यांची गुहा पीपाजी की गुंफा म्हणून ओळखली जाते. राजस्थानातील विणकर अथवा शिंपी समाज पीपाजींना आपले आराध्य दैवत मानतो.

हा समाज ‘श्री पीपा क्षत्रिय दर्जी समाज’ म्हणून ओळखला जातो. उत्तर भारतातील भक्ती आंदोलनातील वीणकर समाजाचा धागा पुन्हा एकदा अधोरेखित होतो.

पीपाजींचा निर्वाण काळ निश्चित उपलब्ध नाही. श्री पीपा क्षत्रिय दर्जी समाजाच्या मान्यतेनुसार पीपाजींना १३६ वर्षांचे आयुष्य लाभले. पीपाजींनी चिंतावानी जोग नावाच्या ग्रंथाची रचना केली होती.

गुरु नानक देवांनी टोडा येथे पीपाजींचे नातू अनंतदास यांच्याकडून पीपाजींच्या रचना संकलित केल्या. अनंतदास यांची काव्यरचना परचईमधील पंचविसाव्या प्रसंगात यासंदर्भात प्रमाण माहिती उपलब्ध आहे. पीपाजींची निर्गुण भक्ती संकल्पना शीख तत्त्वज्ञानाशी साधर्म्य सांगणारी होती.

यामुळे गुरु अर्जन देव यांनी गुरु ग्रंथ साहिबमध्ये पीपाजींच्या एका रचनेचा शबद म्हणून समावेश केला. यामध्ये पीपाजी निर्गुण भक्तीची व्याख्या करताना दिसतात. ते म्हणतात मी अनेक तीर्थक्षेत्रे फिरलो. अखेर माझ्यात मला परमात्म्याचा खजिना प्राप्त झाला. शरीरातच परमेश्वर सामावलेला आहे. शरीरच मंदिर आणि तीर्थ आहे.

त्यामुळे धूप, दीप, नैवेद्य यांचीदेखील आवश्यकता नाही. सोबत काही येत नाही आणि जात नाही. मी प्रभूच्या दयेने त्याची प्रार्थना करतो, जो ब्रह्मांड व्यापून आहे. तोच आपल्या देहात वास करतो.

जो कोणी त्याला शोधून काढेल, त्याला तो निश्चित सापडेल. त्यामुळे पीपा प्रार्थना करतो की परमात्मा सर्वोच्च सार आहे, जो स्वतः सद्‍गुरुच्या माध्यमातून व्यक्त करत असतो.

कायौ देवा काइउ देवल काइउ जंगम जाय।।

काइउ धूप दीप नैबेदा काइउ पूजउ वस्त्रधारी।।

काइआ बहुधा खंड खोजते नव निधि पाई।।

ना कच्छ आइबो ना कच्छ जइबो राम की दढ़हाई।।

जो बढ़र्हमंडे सोए पिंड जो खोजे सो पावै।।

पीपा अध्ययनवै परम तथ है सतीगढ़ढ़ होइ लखावै।।

-----------------

संत पीपाजी आणि त्यांची पत्नी सीता.
Sant Tukaram Maharaj : तुका म्हणे धावा...पंढरी विसावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com