मनीषा दीक्षित
रास अल् जिंझ, म्हणजे कासवांच्या समुद्रकिनाऱ्याचे स्वाती कर्वे यांनी लिहिलेले वर्णनच वाचायलाच हवे. ऑस्ट्रीच म्हणजे शहामृगांचे पालन कसे करतात तेही या पुस्तकात लिहिलेले आहे. वादी तिवीची सहल वाचताना आपण एका वेगळ्याच अनुभवविश्वात फिरून येतो.
प्रत्येकजण जमेल तसा प्रवास करत असतो. ज्याच्या त्याच्यापरीने त्या प्रवासाला महत्त्व दिलेले असते. प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि नंतर प्रवासवर्णन लिहिणे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे, दृष्टिकोनामुळे वेगवेगळे असते.
स्वाती कर्वे यांनी लिहिलेले ओमान.. मस्कत.. हे प्रवासवर्णन अगदी आगळेवेगळे आणि एकमेव झालेले आहे. हे पुस्तक माहितीपर तर आहेच, पण प्रवासावरून परत आल्यावर आपण मैत्रिणीशी गप्पा माराव्यात अशा पद्धतीने ते लिहिलेले आहे. मुळात प्रवासवर्णन लिहावेसे वाटते कारण ते लिहिताना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो. आठवणींतून तो प्रवास पुन्हा अनुभवता येतो. आपला आनंद व अनुभव अनेकांना वाटता येतो.