

Cinema During the 1962 War
Esakal
सुलभा तेरणीकर
सन १९६२च्या चीनच्या आक्रमणानं देश पुन्हा युद्धाच्या खाईत पडला. महागाई, टंचाईनं सामान्य लोक हैराण झाले. पण पुन्हा एकदा राष्ट्रीयत्वाच्या भावनेनं एकसंध उभे राहिले. यात चित्रपट उद्योग मात्र भारतीय जवानांसाठी रस्त्यावर उतरला. भव्य रॅली काढली आणि भरघोस आर्थिक मदतीचा हात पुढे केला. लतादीदींनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाऊन भारतीयांची जखमी मने राष्ट्रीय भावनेत बांधली, तर छोटा जवानमध्ये ‘भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी’ अशी आर्त साद आशाताईंनी घातली. सिनेसृष्टीत ‘शो मस्ट गो ऑन’ या न्यायानं नित्य काहीतरी घडत होते. नित्य नवी स्वप्न पडत होती...
स न १९६२च्या आसपासचा काळ... निवडक कथा-कादंबरीवर आधारित चित्रपट निर्माण करण्याची परंपरा मराठीत सुरू होती. पु. भा. भावे यांच्या अकुलिना कादंबरीवर आधारित माझा होशील का?, डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांच्या वृंदा कादंबरीवर आधारित सुखाची सावली, साने गुरुजींच्या कथेवर आधारित मोलकरीण, गो. गं. पारखी यांच्या कथेवर आधारित पाहू रे किती वाट, अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीवर आधारित फकिरा असे चित्रपट मराठीचं दालन समृद्ध करीत होते, तर माडगुळकर बंधुद्वयाच्या बरोबरीनं मधुसूदन कालेलकर, राम केळकर हे दोघं चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ही अंगं सांभाळीत होते. भालजी पेंढारकर शिवकालावर आधारित कथा लिहित होते.