Premium|Marathi Language : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला; मग शाळा आणि वाचनालये का बंद पडत आहेत?

Marathi Language Preservation : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही शाळा आणि सार्वजनिक वाचनालये बंद पडत असल्याची चिंता; मराठी भाषा, वाचनसंस्कृती आणि ग्रंथालये टिकवण्यासाठी उत्सवांपलीकडे जाऊन कृती करण्याची गरज
Marathi Language Preservation

Marathi Language Preservation

esakal

Updated on: 

विश्वास पाटील

मराठीच्या प्रश्नाकडे सर्व पातळ्यांवर दुर्लक्ष होत आहे. आपण घरात मराठी बोलतो, मराठी भाषा दिन साजरा करतो, वाढदिवस किंवा अन्य प्रसंगी मराठीविषयी अभिमान व्यक्त करतो. मात्र, भाषेच्या अस्तित्वाला आधार देणाऱ्या शाळा, ग्रंथालये आणि वाचनसंस्कृती यांच्या संवर्धनासाठी ठोस प्रयत्न करत नाही. त्यामुळे या सगळ्या उत्सवांचे आणि घोषणांचे प्रयोजन काय, असा प्रश्न पडतो.

साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून यावर्षी महाराष्ट्रात विविध ठिकाणी फिरण्याची संधी मिळाली. या प्रवासात अनेक चांगले अनुभव आले; मात्र मराठी भाषा, मराठी शाळा आणि सार्वजनिक ग्रंथालयांची स्थिती पाहून मनाला धक्काही बसला. एका बाजूला आपण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा अभिमान व्यक्त करतो, त्यासाठी उत्सव साजरे करतो; दुसऱ्या बाजूला शेकडो मराठी शाळा बंद पडत आहेत आणि सार्वजनिक वाचनालयेही बंद होत आहेत. ही विसंगती अस्वस्थ करणारी आहे. मराठीच्या संवर्धनासाठी केवळ उत्सव साजरे करून चालणार नाही, तर त्यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृती करावी लागेल.

अभिजात मराठीचा झेंडा आपण कितीही अभिमानाने मिरवला, तरी मराठी शाळा बंद पडण्याचे प्रमाण रोखता येत नसेल, तर त्या अभिजाततेचा उपयोग काय?

अलीकडेच मला काही आकडेवारी सांगण्यात आली. त्यानुसार, गेल्या दोन वर्षांत जवळपास पाचशेहून अधिक सार्वजनिक वाचनालये बंद झाली आहेत. ही अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बाब आहे. सार्वजनिक वाचनालय हे बहुतांश गावांमध्ये सांस्कृतिक आणि बौद्धिक जीवनाचे केंद्र असायचे. वृद्ध, निवृत्त नागरिक, विद्यार्थी अशा सर्व वयोगटांतील लोकांना या वाचनालयांचा उपयोग होत असे. गावातील अनेकांच्या आयुष्यात या वाचनालयांना महत्त्वाचे स्थान होते. अशी वाचनालये बंद पडत असताना आपल्याला त्याचे गांभीर्य वाटत नसेल, तर आपण मराठीच्या अभिजाततेचा अभिमान कशाच्या आधारावर बाळगायचा?

माझ्या आयुष्यातील एक अनुभव सांगतो. मी हायस्कूलमध्ये शिकत असताना पाचगणीतील एका सार्वजनिक वाचनालयात भरपूर पुस्तके वाचली. माझ्या वाचनाची जडणघडण होण्यात या वाचनालयाचा वाटा होता. तेच वाचनालय पाच-सात वर्षांपूर्वी बंद झाल्याचे कळले, तेव्हा मला धक्का बसला. पाचगणीसारख्या थंड हवेच्या ठिकाणी १९७५ ते १९७७च्या सुमारासही उत्तम ग्रंथालय होते. आज ते बंद पडले आहे. ज्या ठिकाणांनी आपल्याला वाचनाची गोडी लावली, विचारांची दिशा दिली, तीच ठिकाणे काळाच्या ओघात नाहीशी होत आहेत, ही वेदनादायक गोष्ट आहे.

Loading content, please wait...