

Hindi Cinema
esakal
सुलभा तेरणीकर
भारतीय सिनेमाला अर्धशतक उलटून जात असताना ही करमणूक भारतीयांच्या जीवनाचा एक हिस्सा झाली होती. हिंदी सिनेमाच्या मुख्य धारेत अर्थातच विविध भाषा, प्रांत, संस्कृती, बोली, लोककथा, पुराणकथा, परकीय कल्पना यांचे विश्व सामावून गेले होते. तीच गोष्ट हिंदी संगीताची! अर्थात कथेइतकंच संगीतही भिन्न होतं. चित्रनिर्मिती संस्था यासाठी सज्ज होत्या...
विख्यात हिंदी कथालेखक फणीश्वर नाथ रेणु यांनी पु.ल. देशपांडे यांना विचारलं होतं, ‘माझी एक कथा, हिंदी फिल्मवाले मागत आहेत. काय करू?’ पु.ल. म्हणाले, ‘कथा द्या आणि विसरून जा.’ ही गोष्ट अर्थात मारे गये गुलफाम या त्यांच्या कथेबद्दल होती, आणि कथा मागत होते कवी शैलेन्द्र. पुढे तीसरी कसम चित्रपट आला आणि त्याचा इतिहास घडला. खुद्द
पु.लं.नी आपलं सुंदर मी होणार हे नाटक निर्माते-दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांच्या स्वाधीन केलं आणि त्याचा हिंदी सिनेमा आला, आज और कल. मूळ परकीय कृतीवर आधारित सुंदर मी होणार हे अतिशय सुंदर नाटक होतं. १९६३च्या आज और कलची पटकथा आणि संवाद लिहिले होते उर्दू कवी, लेखक अख़्तर-उल-ईमान यांनी! उर्दू, अरेबिक, हिंदी भाषांवर प्रभुत्व असलेल्या अख्तर साहेबांना त्यांच्या उत्कृष्ट लेखनामुळे धर्मपुत्र आणि वक्तसाठी फिल्मफेअर पारितोषिकंही मिळाली होती. शिवाय त्यांच्या साहित्याला साहित्य अकादमीनंही गौरवलं होतं. हिंदी, मराठी चित्रपटनिर्मितीचा अनुभव असलेल्या वसंत जोगळेकरांनी अशोक कुमार, सुनील दत्त, नंदा, तनुजा यांना घेऊन एक उत्कृष्ट निर्मिती केली होती. राज दरबार, खानदानी अभिमान यात घुसमटलेल्या मानवी भावना, लोकशाहीची चाहूल लागलेली असताना स्वतःच्या वैभवाच्या खोट्या अहंकारापायी विखुरलेल्या नात्यांची पर्वा करणाऱ्या महाराजाची भूमिका अशोक कुमार यांनी केली होती. अपंग बेबी राजे ही भूमिका नंदानं साकारली होती आणि बंडखोर मुलीच्या रूपात तनुजा दिसली. साहिर-रवी अशी गीत-संगीतकारांची जोडी होती. मोजकी पाच गाणी होती चित्रपटात. ‘मुझे गलेसे लगाओ बहोत उदास हूँ मैं’ हे आशा भोसले यांनी गायलेलं गाणं आणि ‘इतनी हसीन इतनी जवाँ रात क्या करे’ हे रफींनी गायलेलं गाणं यासह ‘ये वादियाँ ये फिजाएं बुला रही है तुम्हे’ ही सारीच गाणी अविस्मरणीय आहेत. पण एक सुंदर आशयसंपन्न कलाकृती मात्र हिंदी सिनेमाचे चाहते विसरले हे खरं!