

Marathi Sahitya Sammelan 2002
esakal
राजेन्द्र बनहट्टी
माझ्या भाषणात निर्माण झालेले एक अकारण, अकल्पित आणि अनाहूत विचित्र प्रकरण मात्र इतके पत्रोपत्री आणि सहजासहजी मिटले नाही, ते म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि संतश्रेष्ठ तुकाराम यांच्या संदर्भातले. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम ही मराठी वाङ्मयातली दैवते. आळंदी आणि देहू ही मराठी साहित्यपंढरीच्या वारकऱ्यांची तीर्थस्थाने. म्हणून मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या समाधीस्थळांचे दर्शन घेण्यासाठी मी आळंदी आणि देहू या दोन्ही ठिकाणी जाऊन आलो.
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गोष्ट म्हणजे काल्पनिक कथा नाही, तर प्रत्यक्ष घडलेली घटना आहे, तीसुद्धा माझ्या आयुष्यात. २००२मध्ये पंचाहत्तरावे अमृतमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्याला म्हसोबा गेटजवळच्या पोलिस ट्रेनिंग ग्राउंडवर (प्रशिक्षण मैदानावर) भरले होते. कर्मधर्मसंयोगाने मी त्या संमेलनाचा अध्यक्ष होतो.
साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा तीन दिवसांचा गणपती असतो, असे गमतीने म्हटले जाते. संमेलनाचे तीन दिवस त्याचा उदोउदो होतो आणि चौथ्या दिवसापासून तो विस्मृतीत जातो आणि केवळ नोंदरूपाने उरतो, असे म्हणतात. पण मला विचाराल, तर साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा वर्षभराचा गणपती असतो. वर्षभर त्याला कुठे ना कुठे समारंभात भाषण देण्यासाठी बोलावले जाते. त्याचे ठिकठिकाणी सत्कार केले जातात. महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरच्या इंदूर, भोपाळ, बडोदा, हैदराबाद यांसारख्या ठिकाणी कार्यरत असलेल्या मराठी साहित्य संस्थांमध्ये त्याला भाषणे द्यावी लागतात. क्वचित प्रसंगी मराठी भाषा, वाङ्मय यांच्या आणि मराठी साहित्य संस्थांच्या संदर्भातल्या समस्यांची दाद मागण्यासाठी त्याला सरकार दरबारी हजेरी लावावी लागते. हे सगळे रामायण मी स्वानुभवावरून सांगतो आहे. वर्षभराने पुढील संमेलनाचा अध्यक्ष निवडला गेला की या आधीच्या अध्यक्षाचे त्या संमेलनात ‘मावळता अध्यक्ष’ म्हणून ‘विसर्जन’ होते. तत्पूर्वी त्याला नवागत आगामी अध्यक्षाच्या हाती संमेलनाची सूत्रे देताना सूत्रप्रदानाचे भाषण करावे लागते. थोडक्यात, साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे मुख्यतः भाषणबाजी.
अध्यक्षाच्या भाषणबाजीत सर्वात कळसाचे भाषण त्याला सर्वप्रथम करावे लागते, ते म्हणजे अर्थातच ज्या संमेलनाचा तो अध्यक्ष असतो, त्या संमेलनातले त्याचे अध्यक्षीय भाषण. हे त्याचे अध्यक्षीय भाषण झाल्याशिवाय त्याच्या कपाळी अध्यक्षपदाचा टिळा लागत नाही आणि संमेलन संपन्न होत नाही. किंबहुना अध्यक्षीय भाषण हेच संमेलनाचे मुख्य आकर्षण असते. या पूर्वापार प्रथेप्रमाणे पुण्याच्या पंचाहत्तराव्या साहित्य संमेलनात मला अध्यक्षीय भाषण करावे लागले, हे ओघानेच आहे.