विश्वाचे आर्त ।डॉ. सदानंद मोरे
ब्रिटिश राज्यकर्त्यांनी वासाहतिक देशांमधील स्थानिक प्रजेविषयी अंगीकारलेले धोरण म्हणजे तेथील लोक अज्ञानी, असंस्कृत व अर्धरानटी आहेत. त्यांना शिकवून सावरून सुसंस्कृत करणे हा आपल्या म्हणजे राज्यकर्त्यांच्या व धर्मप्रसारकांच्या कार्याचा भागच आहे! सुसंस्कृतीकरणाच्या कार्यक्रमपत्रिकेवरील एक उपकार्यक्रम म्हणजे शांततेची प्रस्थापना! एवढा विनोद जगात कोणीही केला नसेल.
मार्क ट्वेन हा काही ख्रिश्चन धर्माचा टीकाकार नव्हता. मात्र ख्रिस्ती धर्मप्रसारक ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी मूळ ख्रिस्ती धर्मतत्त्वांशी विसंगत असणाऱ्या कृती करीत असल्याची त्याला चीड होती. म्हणून तर त्याने आपल्या टीकास्त्राची मर्यादा केवळ फिलिपिन्सच्या बाबतीत अमेरिकी राज्यकर्त्यांनी अंगीकारलेल्या धोरणांपुरती मर्यादित न ठेवता अमेरिकेबाहेरील, विशेषतः युरोप खंडामधील राष्ट्रे व अमेरिकेसह युरोपातील ख्रिस्ती मिशनरी यांच्यापर्यंत त्या टीकास्त्राचा विस्तार केला. या प्रकरणाची आणखी चर्चा करायला हवी.